Sangli: अखेर चौथ्या दिवशी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, प्रेम प्रकरणातून वारणा नदीत मारली होती उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 06:07 PM2023-08-09T18:07:54+5:302023-08-09T18:10:34+5:30
मोबाइलला स्टेटस ठेवून नदीत उडी घेतली होती
मांगले : मांगले (ता. शिराळा ) येथील तुषार पांढरबळे या तरुणाचा मृतदेह भेंडवडे येथील वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी सायंकाळी ४ वाजता मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.
मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाने शनिवारी दुपारी प्रेम प्रकरणातून मोबाइलला स्टेटस ठेवून नदीत उडी घेतली होती. नदीचे पाणी पत्राबाहेर असल्याने शनिवारी रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी एनडीआरएफच्या २० जणांच्या पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने नदीतील पाण्याची पातळी सुमारे सात फुटांनी कमी आल्याने पाणी पात्रात गेले होते.
मांगले बंधाऱ्यापासून चिकुर्डे बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात दिवसभर दोन यांत्रिक बोटीतून शोध मोहीम राबविली. मात्र, त्यांना तुषार पांढरबळे आढळून आला नाही. तिसऱ्या दिवशी तुषारच्या नातेवाईक व मित्रांनी वारणा नदीच्या दोन्ही बाजूंनी शोध घेतला, मात्र सापडला नाही.
मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे (जि. कोल्हापूर) येथील इनामदार पाणंद रस्त्याजवळील वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. नातेवाईकांनी याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना दिली. डॉक्टरांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री त्याच्यावर बिळाशी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.