Sangli: येरळा नदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला, पती बेपत्ताच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:44 AM2024-08-29T11:44:30+5:302024-08-29T11:44:30+5:30
एनडीआरएफची शोधमोहीम सुरूच
तासगाव : सोमवारी तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून एक दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेले. तेव्हापासून एनडीआरएफ पथकामार्फत शोध सुरू होता. बुधवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता नदी पात्रातील एका जॅकवेलमध्ये अडकलेला महिलेचा मृतदेह एनडीआरएफ पथकाच्या हाती लागला तर, बेपत्ता पतीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.
सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय उत्तम पवार व त्यांची पत्नी रेखा हे दोघे दुचाकीवरून तासगावहून कोरेगावला निघाले होते. वाटेत येरळा नदी पुलावरून दोघे दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफचे पथक पाचारण करून शोध सुरू केला. सलग तीन दिवस शोधकार्य सुरू होते. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह गतीने असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत होते. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातील एका जॅकवेलमध्ये अडकलेला रेखा यांचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला.
बुधवारी रेखा यांचा मृतदेह नदीपात्रातून शोधून काढल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती एनडीआरएफ टीमचे प्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांनी दिली. तर, पोलिसांनी रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या शोधकार्यात एनडीआरएफ टीमसह तहसीलदार अतुल पाटोळे तलाठी पतंग माने, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.
नदीपात्रात अत्यंत गतीने प्रवाह सुरू असलेल्या एका ठिकाणी काळ्या रंगाचे काहीतरी दिसले. त्याचा शोध घेण्यासाठी पथकाची बोट पुढे घेतली असता प्रचंड प्रवाहातून बोट बाजूला सरकत होती, मात्र अधिकच्या कसरतीने व अनुभवातून एनडीआरएफ पथकाने दोन बोटी एकत्र करून, शोध घेतला असता महिलेच्या हाताची दोन बोटे दिसून आली. पुढे पाहिल्यानंतर साडी जॅकवेलमध्ये अडकलेली दिसली. एकीकडे बोट स्थिर होत नव्हती आणि मृतदेह सोडला तर, पुन्हा तो शोधण्यास अडथळ निर्माण होणार होता. अशा थरारातून मृतदेह बाहेर काढण्यास एनडीआरएफला यश आले. - संदीप पवार, जवान, एनडीआरएफ