भाडेकरूच्या दागिन्यांवर घरमालकिणीकडूनच डल्ला, चोरीचे सोनं ठेवलं बँकेत गहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:45 PM2022-02-15T12:45:25+5:302022-02-15T12:45:54+5:30
घरमालकिणीनेच ‘टिप’ देऊन ही चोरी केल्याचे आले समोर
सांगली : शहरातील कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथील चोरीचा एलसीबीने छडा लावला. घरमालकिणीनेच ‘टिप’ देऊन ही चोरी केल्याचे समोर आले. रोहिणी शिवाजी बोस (वय २६, रा.दत्तनगर,सांगली) आणि सचिन मशनू आम्रुसकर (३०, रा.बोजुरी, जि.कोल्हापूर, सध्या दत्तनगर, सांगली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
दत्तनगर येथील बोस हिच्या घरात रूपाली दरेश्वर कुंभार भाड्याने राहण्यास आहेत. ८ नाेव्हेंबर रोजी त्यांची खोली फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. एलसीबीचे पथक याचा तपास करताना, त्यांना संशयित सचिनने ही चोरी केल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने त्यास ताब्यात घेत चौकशी केली. यात त्याने रोहिणी बोस हिनेच त्यांच्याकडे भाडेकरू असलेल्या कुंभार यांच्या घरात चोरी करण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.
कुंभार कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानंतर, तू तुझ्या मित्रांना सांगून चोरी कर, असे संशयित महिलेने सांगितले होते. त्यानुसार, ८ नोव्हेंबर रोजी सचिनने साथीदारांच्या मदतीने घर फोडून सोन्याचा हार, गंठण, नेकलेस व इतर वस्तू चोरून नेल्या होत्या. यातील सोन्याचा हार सचिनने बोस हिला दिला होता, तर इतर ऐवज मुंबई येथील सोनाराकडे गहाण ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, त्यास ताब्यात घेत, सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, सुभाष सूर्यवंशी, शुभांगी मुळीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरलेले सोने बँकेत गहाण
संशयित सचिनने चोरलेला सोन्याचा हार रोहिणीला दिला होता. तिने हा हार शहरातील एका बँकेत गहाण ठेवत ६२ हजार रुपये घेतले होते. पोलिसांनी बँकेत जाऊन हा हार जप्त केला आहे.