मुंबईत विक्रम सावंत यांच्या आमदार निवासातील खोलीचे छत कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:55 PM2024-08-12T17:55:05+5:302024-08-12T17:55:56+5:30
मुंबई/जत : मुंबईत मंत्रालयालगत असलेल्या आमदार निवासमध्ये असलेल्या जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचे छत कोसळले. रविवारी सकाळी ...
मुंबई/जत : मुंबईत मंत्रालयालगत असलेल्या आमदार निवासमध्ये असलेल्या जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचे छत कोसळले. रविवारी सकाळी ही घटना घडली. सावंत हे आमदार निवासातील खोली क्रमांक ४०१ मध्ये राहतात. खाेलीतील ॲन्टी चेंबरमधील प्लास्टरसह छत कोसळले. सुटीचा दिवस असल्याने रविवारी याठिकाणी कोणीही नव्हते. यामुळे माेठी दुर्घटना टळली.
विधान भवन परिसराला लागून आमदार निवास आहे. सुमारे २८ ते ३० वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली आहे. वर्षाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले हाेते. या पाहणीत इमारत धोकादायक झाल्याचे नमूद केले होते. दरम्यान, या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. नरिमन पॉइंट परिसरात आमदार निवासाच्या चार इमारती १९९६ साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम सध्या खराब झाले आहे. सदनिकांमधील छताचा गिलावा व प्लास्टर कोसळत आहे. काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत.
आमदार विक्रम सावंत यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.