जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

By श्रीनिवास नागे | Published: December 3, 2022 06:08 PM2022-12-03T18:08:14+5:302022-12-03T18:09:11+5:30

जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे

The Chief Minister announcement for Jat is misleading says Former BJP MLA Vilasrao Jagtap | जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

googlenewsNext

सांगली : जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी २००० कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा आणि जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याची टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

जगताप म्हणाले, शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच, तर जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी २०० कोटी रुपये त्यांनी दिले आहेत. ही वस्तुस्थिती खरी आहे; परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.

कारण या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्याचे अंदाजपत्रक नाही आणि अजूनही मंत्रिमंडळासमोर विषय आलेला नाही. मंत्रिमंडळाकडे अजून फाईलच गेलेली नाही. विस्तारित योजनेची फाईल नाशिकमध्ये पडून आहे. शिवाय शुक्रवारच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारीदेखील उपस्थित नव्हते.

विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्या

कर्नाटकने जतवर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी ठोस असा निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे जाणकार, अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला, अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा.

Web Title: The Chief Minister announcement for Jat is misleading says Former BJP MLA Vilasrao Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.