बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कॉल, ठाकरेंची शिवसेना अलर्ट; समर्थन मिळविण्याचे युद्ध पेटले
By अविनाश कोळी | Published: October 29, 2022 06:42 PM2022-10-29T18:42:25+5:302022-10-29T18:42:57+5:30
स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून समर्थन नोंदणी पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता.
सांगली : जिल्ह्यासह राज्यात दोन शिवसेनेत नवा संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने कॉल करून समर्थन नोंदविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्याचा दाखला देत ठाकरे यांच्या शिवसेनेने संबंधित क्रमांक पाठवून कार्यकर्त्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सांगलीतील पदाधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे संदेश मोबाइलद्वारे पाठविण्यास सुरुवात केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या ऑनलाइन पत्रकात म्हटले आहे की, शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून राज्यात बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून स्वयंचलित मोबाइल यंत्रणेद्वारे व्हॉईस कॉल करून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. हा कॉल आल्यानंतर एक दाबा, असे ते सूचना करतात. एक दाबल्यानंतर संबंधित प्रणालीद्वारे त्यांच्या गटाला समर्थन नोंदविले जात आहे. अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता.
राज्यातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक व सर्व अंगीकृत संघटनांना याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील सर्वांपर्यंत पोहोचवावेत. या व्हॉईस कॉलला प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टीमला जॉईन होऊ नये, अशीही सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.
जिल्ह्यातही असे कॉल येत आहेत. आम्ही सर्व शिवसैनिकांना अशा कॉलला प्रतिसाद न देण्याची विनंती केली आहे. जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही हा मेसेज पोहोचविला आहे. - शंभूराज काटकर, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट) सांगली