जतच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी
By संतोष भिसे | Published: November 24, 2022 04:29 PM2022-11-24T16:29:45+5:302022-11-24T16:30:25+5:30
म्हैसाळ योजनेमुळे जत तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत शेती फुलली, पूर्वेकडील ६५ गावे मात्र तहानलेलीच आहेत.
सांगली : जत तालुक्याच्या समस्यांवर निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली. जतमधील जनता महाराष्ट्रातच राहणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करतो असेही ते म्हणाले.
सांगलीत पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेंडगे म्हणाले, तालुक्यातील एकाही गावाने कर्नाटकात जाण्याचा ठराव केलेला नाही, किंवा प्रस्ताव पाठविलेला नाही. २०१२ मध्ये मी आमदार असताना काही गावांनी कर्नाटककडून पाण्याच्या मागणीचे ठराव केले होते. पण त्यावर कर्नाटक शासनाने सकारात्मक कार्यवाही केली नाही. उन्हाळ्यात भीषण टंचाईवेळी मागणी करुनही पाणी दिले जात नाही. हिरेपडसलगी किंवा तुरची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळू शकते, पण त्यासाठी कर्नाटकात जाण्याची आमची इच्छा नाही.
शेंडगे म्हणाले, म्हैसाळ योजनेमुळे जत तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत शेती फुलली, पूर्वेकडील ६५ गावे मात्र तहानलेलीच आहेत. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत रामपूर-मल्याळ ही १ हजार ८०० कोटी रुपये खर्चाची योजना सादर केली होती, तिला आजतागायत मंजुरी मिळालेली नाही. आतापर्यंत चार सरकारे झाली, पण एकानेही लक्ष दिले नाही.
सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सहाव्या टप्प्याला मंजुरीची भाषा करत असले, तरी तशी कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात नाही. त्यामुळे आम्ही शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. पिण्याचे व शेतीचे पाणी, अनुदानित मराठी शाळा आदी विषय मांडणार आहोत. लक्ष दिले नाही, तर प्रसंगी रस्त्यावरील आंदोलन करु.
बोम्मई खोटे बोलत आहेत
शेंडगे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई धडधडीत खोटे बोलत आहेत. कर्नाटकात जाण्यासाठी जतच्या एकाही गावाने ठराव दिलेला नाही. २०१२ मध्ये झालेले ठराव पाण्यासाठी होते.