सूर्याभोवती तयार झाले वर्तुळाकार 'तेजस्वी'कडे, खळ पाहण्यासाठी सूर्याकडे लागल्या सांगलीकरांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:51 PM2022-09-20T12:51:34+5:302022-09-20T13:29:49+5:30
आकाशात बऱ्याच वेळा इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा असे खळे दिसते
सुरेंद्र दुपटे
सांगली : सांगलीकरांनी काल,सोमवारी दुपारी सूर्याभोवती खळ पडलेचा आनंद घेतला. खळ पाहण्यासाठी सूर्याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या.
याबाबत प्रा. संजय ठिगळे यांनी सांगितले की, आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२°चे खळे (Halo) हे एक सुंदर दृश्य आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वीकडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात.
आकाशात तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असता सूर्यप्रकाश किंवा चंद्राचे चांदणे / किरण जेव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते. २२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. आकाशात बऱ्याच वेळा इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा असे खळे दिसते. अशी माहिती प्रा. ठिगळे यांनी दिली.