सांगली महापालिकेला दणका; २४ कोटी भरा, अन्यथा बँक खाती गोठवू
By शीतल पाटील | Published: April 21, 2023 06:24 PM2023-04-21T18:24:30+5:302023-04-21T18:24:51+5:30
भविष्य निर्वाह निधी प्रकरणात कोल्हापूर आयुक्तांची नोटीस
सांगली : महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर वर्ग केलेली नाही. याबाबत कामगार सभेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. औद्योगिक न्यायालयाने कामगार सभेच्या बाजूने निकाल दिला. तरीही महापालिकेने २४ कोटी ५४ लाख रुपयांच्या रकमेचा भरणा केला नाही. अखेर भविष्य निर्वाह निधी कोल्हापूर विभागाच्या आयुक्तांनी महापालिकेला नोटीस बजावून रक्कम न भरल्यास बँक खाती गोठविण्याची नोटीस बजाविली आहे.
दरम्यान, महापालिकेने सहा कोटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे भरून नोटीशीला स्थगिती मिळविल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, महापालिकेकडील बदली, मानधन, रोजंदारी असे सुमारे ९ हजार २०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हीडंड फंड महापालिकेने कपात करावा म्हणून संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही महापालिका संघटनेच्या मागणीस दाद दिली नाही. संघटनेच्यावतीने औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली. कामगारांना जानेवारी २०११ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीतील प्रॉव्हीडंड फंडाची रक्कम महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली नसल्यामुळे कामगार व व महापालिकेच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह कोल्हापूर कार्यालयाकडे भरावी, अशी मागणी केली. त्यावर औद्योगिक न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२१ मध्ये कामगार संघटनेच्या बाजूने निकाल देताना तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश कोल्हापूर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना दिले होते.
न्यायालयाच्या निकालानंतरही महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर कामगार संघटनेने कोल्हापूर आयुक्तांनाकडे तक्रार दाखल केली. महापालिकेने २४ कोटी ५४ लाख ५९ हजार ९६७ रुपयांचा भरणा करण्याची नोटीस दिली. तसेच रक्कम जमा न केल्यास बँकेची खाती गोठविण्याचा इशाराही दिला.
या कारवाईनंतर महापालिकेने कोल्हापूर आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्यापोटी ६ कोटी १३ लाख ६४ हजार रुपये जमा करून उर्वरित ७५ टक्के रकमेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती घेतली आहे.