वैद्यकीय अधिकारी ऑगस्टपासून वेतनाविना, निधीचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:37 IST2025-01-14T18:36:43+5:302025-01-14T18:37:24+5:30
सांगली : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियुक्तीस असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतर आणि ...

वैद्यकीय अधिकारी ऑगस्टपासून वेतनाविना, निधीचा तुटवडा
सांगली : जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियुक्तीस असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील सत्तांतर आणि पुरवणी मागण्या मंजूर होण्यास झालेला विलंब यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
जिल्ह्यातील सुमारे ६५ हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी ऑगस्टपूर्वीपासून, तर काही ठिकाणी ऑक्टोबरपासून त्यांच्या नियुक्त्या आहेत. या सर्वांनाच वेतनासाठी पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक केंद्रात एक मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्यासोबत सहायक म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे. एमबीबीएस पदवीधर असलेल्या कंत्राटी अधिकाऱ्यांना मासिक ७५ हजार रुपये मानधन आहे, तर बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये मानधन दिले जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाहीत. पण हे मानधन ऑगस्टपासून मिळालेले नाही.
यातील काही वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाल्यापासूनच मानधनापासून वंचित आहेत. नोकरीस लागल्यापासून त्यांना एकदाही मानधन मिळालेले नाही.
दरम्यान, केंद्रांतील कंत्राटी कर्मचारीही वेतनापासून वंचित आहेत. चिकुर्डे, बिळाशी, मुचंडी या केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी काही दिवस काम बंद आंदोलनही केले, पण मानधन पदरात पडू शकले नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, लिपिक, स्त्री व पुरुष परिचर अशा विविध पदांवर कंत्राटी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागज, वांगी, लेंगरे, नागज, चिकुर्डे, वाटेगाव, देवराष्ट्रे येथील कर्मचाऱ्यांचे मानधन विस्कळीत आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वेळेत उपलब्ध झाला नाही. जसजसा निधी उपलब्ध होईल, त्यानुसार पगाराची बिले कोषागार कार्यालयाकडे पाठविली आहेत. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पगारबिले नुकतीच कोषागारात पाठविली आहेत. विधिमंडळात पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर निधी येऊ लागला आहे. मानधन लवकरच खात्यावर जमा होईल. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी