Sangli: तासगावात वाहून गेलेले दाम्पत्य सातारा जिल्ह्यातील, सलग दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:01 PM2024-08-27T18:01:46+5:302024-08-27T18:02:31+5:30
आईच्या अंत्यविधीनंतरचे सर्व विधी करून माघारी जाताना घडली दुर्घटना
तासगाव : तासगाव हद्दीत येरळा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी वाहून गेलेले जोडपे सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) गावचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आईचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी रेखा दत्तात्रय पवार (वय ४४) या पती दत्तात्रय उत्तम पवार (५२) यांच्यासोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या. अंत्यविधीनंतरचे सर्व विधी करून माघारी पिंपोडे बुद्रुकला जात असताना येरळा नदीच्या पुलावरून वाहून गेले. एनडीआरपीच्या पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू होती. मात्र अद्याप तपास लागला नाही.
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथील रेखा पवार यांचे तासगाव येथे आई-वडील वास्तव्यास होते. आईचा मृत्यू झाल्यानंतर रेखा पवार पती दत्तात्रय पवार यांच्या सोबत शनिवारी तासगावला आल्या होत्या. अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी झाल्यानंतर सोमवारी दोघे पती-पत्नी पिंपोडे बुद्रुकला निघाले होते. जुना सातारा रस्त्यावर तासगाव ते तुरचीच्या दरम्यान असलेल्या येरळा नदीवरील पुलावर गेल्या काही दिवसांपासून पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मात्र त्या ठिकाणाहून सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पवार दाम्पत्य तुरचीच्या दिशेने निघाले होते. तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र तरीही दुचाकीवरून हे दांपत्य पुलावर गेले. पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्यामुळे, तोल जाऊन दुचाकीसह दोघेही नदीच्या प्रवाहात कोसळले. त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली एनडीआरएफच्या पथकाला पाचरण केले. काल रात्री उशिरापर्यंत पथकाकडून शोध मोहीम सुरू होती. मात्र तपास लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या पथकाकडून शोधमोहीम राबवण्यात आली. दिवसभर शोधमोहीम सुरू होती. तरीही तपास लागू शकला नाही. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह पवार दांपत्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
आईच्या रक्षाविसर्जना दिवशीच लेक-जावयाची दुर्घटना
रेखा पवार यांच्या आईचे सोमवारी रक्षाविसर्जनसह सर्व अंत्यसंस्कारानंतरचे विधी पार पडले. त्यानंतर लेक आणि जावई स्वतःच्या गावी निघाले. मात्र गावी निघाले असतानाच त्यांच्या बाबतीत दुर्घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
तासगाव पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद
सोमवारी गावाकडे येण्यासाठी निघालेले आई-वडील रात्री उशिरापर्यंत गावी न आल्याने आणि त्यांचा मोबाईल लागत नसल्याने, पवार दांपत्याचा मुलगा योगेश दत्तात्रय पवार यांनी आई-वडील बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात केली आहे.