Sangli: कालव्यात पडून रात्रभर तडफडत राहिले जीव, तासगावच्या अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:37 PM2024-05-30T12:37:53+5:302024-05-30T12:38:57+5:30
अपघातात बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली
दत्ता पाटील
तासगाव : चिमुकल्या राजवीच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे अनेक सुंदर क्षण कवेत घेऊन तासगावचे राजेंद्र पाटील त्यांच्या दोन्ही मुली व नातवंडांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. मनाच्या पटलावर कार्यक्रमातील आनंदाच्या लाटा उधाणलेल्या असतानाच परतीच्या प्रवासात अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच मृत्यूच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला अन् तीन कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाली. वाढदिवसाच्या आनंदाच्या कोंदणात काळाने मृत्यूचे गोंदण काेरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
बांधकाम अभियंता असलेले राजेंद्र पाटील यांच्या लहान मुलीच्या मुलीचा मंगळवारी तिसरा वाढदिवस. यानिमित्ताने सर्व परिवाराने एकत्रित येऊन मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला. आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले. कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून पाटील कुटुंबीय तासगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. मोठी मुलगी पुण्याहून उन्हाळ्याच्या सुटीसाठी आठ दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. तिच्यासह तिच्या दोन्ही मुली सोबतच होत्या. वाढदिवस झाल्यानंतर कोकळे येथे असणारी लहान मुलगी आणि वाढदिवस झालेली नात राजवी यांनाही सोबत घेतले आणि उन्हाळ्याच्या सुटीचे आठ दिवस एकत्रित मुली आणि नातवंडांसमवेत साजरे करण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले.
तासाभराचा प्रवास करून मध्यरात्री ते तासगावजवळ आले आणि अवघ्या काही मिनिटांचा प्रवास शिल्लक असतानाच वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार कालव्यात कोसळली. हा अपघात पहाटेपर्यंत कोणाच्याच लक्षात आला नाही. अखंड रात्र रक्ताच्या थारोळ्यात चुराडा झालेली कार पडून होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात लक्षात आल्यानंतर एकच हलकल्लोळ माजला.
मृत्यू झालेल्या सहाही जणांचे पार्थिव जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राजेंद्र पाटील यांचा मुलगा आणि मोठा जावई हेदेखील बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर रुग्णालयात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश आणि मन सुन्न करणारे चेहरे पाहायला मिळत होते.
काही मिनिटांच्या अंतरावर घर आले असतानाच प्रवासात पाटील कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. या घटनेने तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबीयांच्या नातेवाइकांचा आक्रोशदेखील काळीज पिळवटून टाकणारा होता.
..अन् बाळ पोरका झाला
अभियंता असलेल्या राजेंद्र पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. दोन्ही मुलींचेे लग्न झाले, तर मुलगा नुकताच अभियंत्याची पदवी घेऊन पुण्याला करिअरसाठी गेला होता. अपघाताची माहिती मिळताच तो काही तासांत ग्रामीण रुग्णालयात आला. तिथे आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर त्याने मोठा हंबरडा फोडला. आई-वडिलांनी मुलाचे ‘बाळ’ असे टोपण नाव ठेवले होते. या अपघाताने बाळ पोरका झाल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.
रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर आक्रोश
रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी कॅनॉलमध्ये पडल्यानंतर गाडीचा चुराडा झाला. गाडीत असलेल्या पोटच्या मुलीसह, आई-वडील, बहीण आणि बहिणीच्या दोन्ही मुलींचा नजरेसमोर मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात अपघातात बचावलेल्या राजेंद्र पाटील यांची धाकटी कन्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली. मात्र, हा आवाज कोणाच्या कानावर पोहोचला नाही. तब्बल सहा तास मरणासन्न वेदना भोगत गाडीतच तब्बल सहा तास काढले.
पतीच्या डोळ्यातून वेदनांच्या धारा
राजेंद्र पाटील यांची मोठी मुलगी प्रियांका खराडे पुणे येथे पतीच्या नोकरीच्या ठिकाणी स्थायिक आहे. आठच दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रियांका दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन माहेरी आल्या होत्या. मात्र, काळाने घाला घातल्यामुळे दोन्ही मुलींसह प्रियांकाला जीव गमवावा लागला. पुण्याहून आलेल्या पती अवधूत खराडे यांनी रुग्णालयाच्या आवारातच हंबरडा फोडला होता. अवघे कुटुंबच या अपघातात उद्ध्वस्त झाले.