फुकट कपडे व महिन्याला हप्त्याची मागणी, मिरजेत गुन्हेगाराने कापड विक्रेत्याला दिली खुनाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:10 PM2023-03-04T17:10:42+5:302023-03-04T17:11:10+5:30
‘मी खुनाच्या गुह्यातून सुटून आलोय. मला फुकट पॅन्ट व शर्ट व महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता दिला नाहीस तर तुझा खून करीन,’
मिरज : मिरजेत वखार भाग येथील कापड दुकानात फुकट कपडे व दर महिन्याला हप्त्याची मागणी करत कापड विक्रेत्याला खुनाची धमकी दिल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार नीलेश परशुराम सलगर (रा. मिरज) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कापड दुकानदार योगेश अरुण शिंदे (वय २६) यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. नीलेश सलगर हा मिरजेतील प्रदीप हंकारे खून प्रकरणातील आरोपी आहे.
मिरजेत कोकणे गल्लीत शिंदे यांचे तयार कपड्याचे दुकान आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी नीलेश सलगर हा दोघा साथीदारांसोबत शिंदे यांच्या कापड दुकानात आला. यावेळी योगेश शिंदे हे गिऱ्हाईकांना कापड दाखवत असताना नीलेश सलगर याने त्यांना दमबाजी केली. मला प्रत्येक महिन्याला एक जोड नवीन कपडे व हप्ता दे, अशी मागणी करून सलगर याने शिवीगाळ केली.
त्यानंतर सुमारे तीन हजार रुपये किमतीचे पॅन्ट व शर्ट घेऊन नीलेश सलगर निघत असताना योगेश शिंदे यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी निलेश याने आपण खुनाच्या गुन्ह्यातून सुटून आलो आहे. फुकट कपडे हवेत, शिवाय दरमहा एक हजार रुपयांचा हप्ताही मागितला. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला अद्याप अटक केलेली नाही.
कोयता घेऊन ये रे...
यावेळी नीलेशने ‘मी खुनाच्या गुह्यातून सुटून आलोय. माझ्यावर भरपूर केसेस आहेत. मला फुकट पॅन्ट व शर्ट व महिन्याला एक हजार रुपयांचा हप्ता दिला नाहीस तर तुझा खून करतो,’ अशी धमकी दिली. यावेळी नीलेश याने त्याच्या साथीदाराला ‘कोयता घेऊन ये रे,’ असे म्हणत योगेश शिंदे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली