वसंतदादा बँक घोटाळ्यात उलटतपास पुढील आठवड्यात पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:34 PM2022-09-07T16:34:40+5:302022-09-07T16:35:01+5:30
अवसायनातील वसंतदादा बँकेतील २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २५ तत्कालीन संचालकांना त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत बँकेने दिलेल्या अर्जावर सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे
सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेतील २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २५ तत्कालीन संचालकांना त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत बँकेने दिलेल्या अर्जावर सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी उलटतपास पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याची सुनावणी ९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
बँकेचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यामार्फत घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. २७ संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबतचे आदेश यापूर्वी दिले होते. पुणे येथील न्यायाधिकरणाने ते आदेश अंशत: रद्द केले होते. दरम्यान, बँकेमार्फत मालमत्तेवर बोजा चढविण्याबाबत दिलेल्या अर्जावर संचालकांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यातील अनेक संचालकांच्या वकिलांनी मागील काही सुनावणीत युक्तिवाद केला. सध्या बँकेच्या चाैकशीअंतर्गत उलट तपासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे. घोटाळ्याच्या आरोपपत्रात २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समावेश आहे.
घोटाळ्याची रक्कम झाली कमी
- कलम ७२ (२) नुसार झालेल्या चौकशीत २८६ खातेदारांच्या ३६४ कोटी २० लाख ५७ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांवर आक्षेप होते.
- कलम ७२ (३) मधील चौकशीवेळी पाच वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ६५ खात्यांची ५७ कोटी ८ लाख ५४ हजारांची कर्ज प्रकरणे वगळली गेली.
- चौकशीदरम्यान वसुली होऊन ५९ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांची ११४ खाती बंद झाली. ७२ (३) प्रमाणे आता १०७ खात्यांच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शिल्लक आहे.