मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:36 PM2022-04-04T14:36:28+5:302022-04-04T14:37:10+5:30

पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार

The dam on Krishna river in Sangli will be removed says Jayant Patil | मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी

मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी

googlenewsNext

सांगली : पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सांगलीवाडी येथे शंकरघाट सुशोभीकरण प्रसंगी ते बोलत होते.

सुमारे ५० लाख रुपये खर्चून घाटावर रॅम्प व संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. रॅम्पवरून बोटी नदीत उतरविणे आणि बाहेर काढता येतील अशी संकल्पना आहे. पाटील म्हणाले, म्हैसाळमध्ये सध्याचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हटवून सुमारे २५० कोटींचे बराज उभारणार आहे. त्यानंतर आयर्विन पुलापर्यंतचे सर्व अडथळे हटविले जातील. बराजमुळे म्हैसाळपासून मागे कसबे डिग्रजपर्यंत पाणीसाठा होईल.

सांगलीत वसंतदादांच्या स्मारकापासून, स्मशानभूमी व धरणापर्यंत चालत जाता येईल, असे बांधकामही लवकरच केले जाईल. सध्याच्या नव्या पुलामुळे पाण्याला अडथळा होणार नाही. त्याच्या खांबांनाही आयर्विनप्रमाणेच सुशोभित दगड असतील. कृष्णेवर संरक्षक भिंत बांधली, तर ४५ फुटांपर्यंत पाणी अडवता येईल. पुरावेळी लोकांना बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

कार्यक्रमाला महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, दिलीप पाटील, संजय बजाज, पद्माकर जगदाळे, हरिदास पाटील, राहुल पवार, अविनाश पाटील, विष्णू माने, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता ज्योती देवरे, प्रकाश पाटील, महाबळेश्वर चौगुले, संपत पाटील, जयश्री पाटील, अरुण थोरात, दिनेश बंदिवाडेकर, ओंकार कोळी, गजानन पाटील, वर्षा शिंदे, अभिजित कदम, अपर्णा कोळी आदी उपस्थित होते.

वसंतदादांच्या स्मारकाला मी निधी दिला

मंत्री पाटील म्हणाले, वसंतदादांच्या स्मारकासाठी निधी गोळा करण्याचे काम समितीद्वारे सुरू होते, पण समितीला कोण निधी देत नव्हते. आपल्या नेत्याच्या स्मारकासाठी वर्गणी गोळा करणे पटले नाही, म्हणून स्मारकासाठी मी अंदाजपत्रकात तरतूद केली. यापूर्वी अशी तरतूद केली जात नव्हती.

मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा

मंत्री पाटील म्हणाले, नदीकाठच्या परिसराचे सुशोभीकरण केले जाईल. चौपाटीवर गेल्यासारखे वाटेल. काही दिवसांपूर्वी काशी विश्वेश्वरासमोर गंगेत डुबकी मारायला कोणीतरी गेले होते, तशीच डुबकी येथेही मारण्याचा मोह होईल, अशी व्यवस्था करू.

Web Title: The dam on Krishna river in Sangli will be removed says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.