सांगली जिल्ह्यातील तात्यांच्या बनगरवाडीत थिरकल्या नृत्यांगना, डीजेंचा दणदणाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:30 IST2024-11-29T15:23:54+5:302024-11-29T15:30:19+5:30
गावातील वृद्धमंडळींना त्रास

सांगली जिल्ह्यातील तात्यांच्या बनगरवाडीत थिरकल्या नृत्यांगना, डीजेंचा दणदणाट
लक्ष्मण सरगर
आटपाडी : थोर साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी दुष्काळी भागातील पाण्याच्या दुर्भिक्षतेने गाव सोडून जगण्यासाठी गेलेल्या बनगरवाडीचे भयानक वास्तव कथानक स्वरूपात ‘बनगरवाडी’ या कादंबरीतून मांडले. मात्र तीच बनगरवाडी आता वेगळ्या वळणावर पोहोचल्याचे चित्र दिसून आले. इथले अनेक तरुण वरातीसमोर नृत्यांगना नाचवत बीभत्स गाण्यावर नृत्य करताना दिसले.
व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी साकारलेली बनगरवाडी अर्थात आजची लेंगरेवाडी (ता. आटपाडी) होय. त्या काळातील तरुण मास्तर हा मुलांनी शिकावे यासाठी धडपडत होता. दुष्काळ जरी असला तरी परिस्थिती फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच बदलू शकते याबाबत ठाम विश्वास होता. आता बनगरवाडी बदलली आहे. शिक्षण घरोघरी पोहचले आहे. दुष्काळ हटून सुकाळाकडे गावाची वाटचाल सुरू आहे. गाव सोडून जाणारी मंडळी गावातच बऱ्यापैकी स्थिरावली आहेत. तर काही माथाडी कामानिमित्त मुबंई, पुण्यात स्थलांतर होत आहेत.
काळ बदलला असून विवाह सोहळ्यातून परंपरेचे व संस्कृतीचे दर्शन घडत नाही. सोहळे बदनाम होऊ लागले आहेत. शिकलेले अनेक तरुण चंगळवादी बनू लागले आहेत. याचेच उदाहरण बुधवारी लेंगरेवाडीत पहायला मिळाले. गावात एकाच दिवशी तीन विवाह सोहळे पार पडले. नवदाम्पत्यांची वरात डीजेच्या तालावर सुरू झाली. जेमतेम दोनशे ते तीनशे फूट अंतरावरील रस्त्यावर एकाच ठिकाणी तीन डीजेवाल्यांची स्पर्धा रंगली. त्यावर कहर म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बीभत्स नृत्यांवर नाचणाऱ्या आठ ते दहा नृत्यांगना तरुणांना आकर्षित करत होत्या. यामुळे सुमारे हजारहून अधिक तरुण बेभानपणे डीजेच्या तालावर नृत्यांगनासमोर नाचत मोबाइलमध्ये छबी टिपताना दिसले.
तरुण पिढी शिकली व मोठी झाली. त्यांच्या हातात जग आले. मात्र आज बीभत्स नाचणारी तरुणाई वेगळ्या वळणावर पोहचल्याचे दिसत आहे. साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांची त्या काळातील बनगरवाडी सध्या कात टाकत असली तरी येथील तरुणाई धोक्याच्या वळणावर चालली आहे.
गावातील ज्येष्ठ मंडळींनी अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे. मात्र प्रतिष्ठित नागरिकच मुलाच्या वरातीला डीजे आणून नृत्यांगना वरातीसमोर नाचवत असतील तर तरुणाईला कोण आवरणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आवाजाने थरकाप
लेंगरेवाडीत अनेक वयोवृद्ध पुरुष व महिला आहेत. गाव अतिशय लहान असल्याने एकाच डीजेचा आवाज वयोवृद्धांना सहन होत नाही. एकाचवेळी तीन डीजे सुरू झाल्याने त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. कर्णकर्कश्श आवाजाने व डीजेवाल्यांच्या स्पर्धेने अनेक रुग्णांना त्रास जाणवला.