Sangli: मारहाणीतील जखमी तरूणाचा मृत्यू, चौघांवर खुनाचा गुन्हा; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:40 AM2024-01-11T11:40:18+5:302024-01-11T11:40:37+5:30
ऊसतोड मजुरांची जनावरे पिकात गेल्याच्या रागातून मारहाण
विटा : शेतात राहण्यास जागा दिलेल्या ऊसतोड मजुरांची जनावरे पिकात गेल्याच्या रागातून काठीने डोक्यात मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या रवींद्र धोंडीराम नलवडे (वय ३६, रा. पंचलिंगनगर, भाळवणी) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी संशयित प्रवीण मोहन नलवडे (वय ३०), दीपक मोहन नलवडे (वय २९), सागर विलास नलवडे (वय ३१) व छबाबाई मोहन नलवडे (सर्व रा. पंचलिंगनगर, भाळवणी, ता. खानापूर) या चौघांविरुद्ध विटा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर (भाळवणी) येथील रवींद्र नलवडे यांच्या शेतात ऊसतोड मजुरांना राहण्यासाठी जागा दिली आहे. दि. ३१ डिसेंबरला ऊसतोड मजुरांची जनावरे संशयित प्रवीण नलवडे याच्या शेतात शिरली. जनावरांनी पिकांचे नुकसान केल्याचा कारणावरून संशयित प्रवीण, त्याचा भाऊ दीपक मोहन नलवडे, साथीदार सागर नलवडे यांनी रवींद्र यांच्या डोकीत, कपाळावर, हातावर काठीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र नलवडे यांना सांगलीच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना साेमवारी त्यांचा मृत्यू झाला. मृत रवींद्र यांचे भाचे जितेंद्र पवार (रा. तासगाव) यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रवीण, दीपक, सागर नलवडे याच्यासह छबाबाई नलवडे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील छबाबाई नलवडे ही फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. उपनिरीक्षक सचिन शेंडकर अधिक तपास करीत आहेत.