वाळव्यात ओव्हरफ्लो, तर जतला विहिरी तळाला; सप्टेंबरमध्ये बरसणार सर्वाधिक पाऊस !
By अशोक डोंबाळे | Published: September 10, 2022 06:43 PM2022-09-10T18:43:32+5:302022-09-10T18:45:18+5:30
दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस : जत पूर्वभागामध्ये मात्र अत्यल्प पाऊस
अशोक डोंबाळे
सांगली : वाळवा, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तेथील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. जत तालुक्यात पाऊस झाला आहे. पण, जत पूर्व भागामध्ये मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे तेथील विहिरींनी आजही तळ गाठलेलाच आहे. कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यात सप्टेंबरमध्ये तुफान पाऊस झाला आहे. ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत असून, तलाव फुल्ल झाले आहेत.
जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत सरासरी ४२२.१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस झाल्यामुळे जून, जुलै महिन्याचा बॅकलॉक भरुन निघाला असून ५१६.८ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यात १२२.४ टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळी आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यात १३८ टक्के, तर कवठेमहांकाळ तालुक्यात २१८ टक्के पाऊस झाला आहे. शिराळा, वाळवा तालुक्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर जत तालुक्यातील पूर्व भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे तेथील विहिरींनी पावसाळ्यातही तळच गाठलेला आहे.