सांगली जिल्ह्यातील अंकलेची विकास दुधाळ टोळी तडीपार, पोलीस प्रमुखांचा दणका
By शरद जाधव | Published: December 7, 2022 08:21 PM2022-12-07T20:21:40+5:302022-12-07T20:22:11+5:30
सांगली जिल्ह्यातील अंकलेची विकास दुधाळ टोळीला तडीपार करण्यात आले आहे.
सांगली : बेकायदा जमाव जमवून हत्याराने दुखापत करणे, अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे, जीवे मारण्याची धमकी देणे यांसह अन्य गुन्ह्यातील अंकले (ता. जत) येथील विकास दुधाळ आणि त्याच्या पाच साथीदारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश दिले.
विकास विलास दुधाळ (वय २६), श्रीकांत युवराज पाटील (२५), लालासाहेब ऊर्फ समाधान युवराज पाटील (२२), अजय ऊर्फ अजितराव रावसाहेब दुधाळ (२२), भारत ऊर्फ अमोल विलास दुधाळ (२३) व रवींद्र भाऊसाहेब दुधाळ (२५, सर्व रा. अंकले, ता. जत) अशी कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत.
विकास दुधाळ आणि त्याच्या साथीदारांनी जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळे गुन्हे करत दहशत निर्माण केली होती. या टोळीतील सदस्यांवर वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. जत पोलिसांनी या टोळीवर कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार तपास करून व सुनावणी घेऊन सहा जणांना सांगली व सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले.