यंत्र टाळणार सिलिंडर स्फोटाचा धोका, सांगलीतील आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली नामी उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:14 PM2023-12-26T17:14:23+5:302023-12-26T17:14:23+5:30
आधी हेल्मेट, मगच दुचाकी
सांगली : दैनंदिन व्यवहारातील अनेक समस्या, संकटांचे निवारण करणारी नामी उपकरणे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन अनेक कुटुंबे उदध्वस्त होतात. ही गळती शोधणारे उपकरण विद्यार्थ्यांचा संशोधक वृत्तीचे फलित ठरले आहे.
सिलिंडरचा कॉक बंद न केल्याने किंवा रबरी रिंग खराब झाल्याने अनेकदा स्वयंपाकघरात गॅसची गळती होते. सकाळी स्वयंपाकासाठी किंवा पाणी तापविण्यासाठी शेगडी पेटविताच गॅसचा भडका होतो. प्रसंगी सिलिंडरचा स्फोटही होतो. गृहिणींना अनेकदा ही गळती लक्षात येत नाही. हॉटेल्स, उद्योग येथेही गॅस गळतीमुळे स्फोटाच्या दुर्घटना घडतात. ही गॅसची गळती शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी गॅस सेन्सर विकसित केला आहे.
जेव्हा गॅस गळती होते, तेव्हा हा सेन्सर कार्यान्वित होतो. तत्काळ अलार्म वाजू लागतो. घरातील सर्व विद्युत दिवे आपोआप बंद होतात. अलार्ममुळे गॅस गळती लक्षात येऊन दुर्घटना टळते. अक्षय पाटील, संकेत कांबळे, प्रदीप खरात, विद्या पाटील, प्रियंका शिरोळकर या विद्यार्थ्यांनी उपकरण विकसित केले आहे.
आयटीआयमध्ये नुकत्याच झालेल्या तंत्र प्रदर्शनात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संकेत आवटी, यश पवार, अथर्व चव्हाण, अवधूत साळुंखे, सूरज जमादार या विद्यार्थ्यांनी दुहेरी काम करणारी हायड्रॉलिक प्रेस तयार केली आहे. व्यवहारात एकेरी काम करणारी प्रेस वापरली जाते, त्यामुळे ही प्रेस वेगळी ठरली आहे.
या विद्यार्थ्यांना त्यांना गटनिदेशक अशोक चंदे, शिवाजी चव्हाण, प्राचार्य व्ही. बी. देशपांडे, उपप्राचार्य एम. एस. गुरव, शिवाजी गोसावी आदींनी मार्गदर्शन केले.
आधी हेल्मेट, मगच दुचाकी
हेल्मेट घालून दुचाकी चालवावी यासाठी वाहतूक पोलिस कितीही प्रबोधन करत असले, तरी वाहनचालक ऐकत नाहीत. यावर उपाय म्हणून सेन्सरयुक्त हेल्मेट विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. चालकाने डोक्यावर हेल्मेट घातल्यानंतरच दुचाकी सुरू होते.