कोल्हापुरात कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ‘ऑक्ट नाईन’च्या संचालकास सांगलीत अटक
By शरद जाधव | Published: December 2, 2022 07:27 PM2022-12-02T19:27:17+5:302022-12-02T19:27:58+5:30
जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांना गंडा
सांगली : कोल्हापूर येथे जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या संशयितास विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. अभिजित जोती नागावकर (वय ३५, रा. अयोध्या पार्क, ओल्ड पी.बी. रोड, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून मोटार, सात मोबाईल असा सहा लाख ३४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथे ऑक्ट नाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन एलएलपी कंपनीच्या माध्यमातून दरमहा आठ टक्के बोनस देण्याच्या व १८ महिन्यात मूळ रक्कम परत देण्याच्या आमिषाने ६० लोकांकडून कोट्यवधीची रक्कम गोळा करण्यात आली होती. शेअर मार्केटसह अन्य मार्गाने परतावा देण्याचे आमिष या कंपनीने दाखविले होते. कोल्हापुरात या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यावर सर्वजण पसार झाले होते. यातील संचालक नागावकर यास विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले.
शहरातील शंभरफुटी रस्त्यावर विश्रामबाग पोलिसांचे पथक नियमित गस्तीवर असताना, भरउन्हात रस्त्यावर मोटार थांबल्याचे दिसून आले. मोटारीच्या काचांना पडदे लावलेले होते. आत काहीजण असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी तेथे जात माहिती घेतली असता, त्यात नागावकर असल्याची माहिती मिळाली. त्याला जेरबंद करून राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, आदिनाथ माने, दरिबा बंडगर, भावना यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयिताकडे सात मोबाईल
कोल्हापुरात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालून पसार झालेल्या नागावकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ तब्बल सात मोबाइल आढळून आले. एकाच व्यक्तीकडे इतके मोबाइल आढळल्याने पोलिसही चक्रावले.