Sangli News: सागरेश्वर देवालयाच्या जागेचा वाद चिघळला, पुजाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:33 PM2023-05-11T17:33:14+5:302023-05-11T17:34:48+5:30
गेल्या अनेक वर्षापासून सागरेश्वर परिसरातील वादग्रस्त २० आर जागेचा वाद न्यायप्रविष्ट
देवराष्ट्रे : सागरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या कुंडाजवळ सागरेश्वर देवस्थानमार्फत पाण्याचा फिल्टर बसवण्याचे काम चालू होते. पण ते काम केदारनाथ महाराजांच्या भक्तगणांनी बंद केले. सागरेश्वरच्या पुजाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
सागरेश्वर देवस्थानच्या मुख्य मंदिरापासून पाच फूट अंतरावर पाण्याचे तीन कुंड आहेत. येथे येणाऱ्या भक्तांसाठी पाण्याचा फिल्टर बसवण्यात येणार होता. पण केदारनाथ महाराजांच्या भक्तांनी यास विरोध केला आहे. सागरेश्वर येथील जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे बांधकाम करायचे असेल तर शासकीय परवानगी आणून करा, असा तक्रार अर्ज केदारनाथ भक्तगणांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सागरेश्वर परिसरातील वादग्रस्त २० आर जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. याबाबत अनेक वेळा वाद विवाद झाले आहेत. प्रसंगी देवराष्ट्रे गावात गाव बंद, रस्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर हा वाद न्यायालयात गेला आहे. केदारनाथ महाराज विरुद्ध सागरेश्वर देवस्थान, देवराष्ट्रे ग्रामपंचायत असा वाद आहे.
केदारनाथ महाराज ट्रस्टला देण्यात आलेली २० गुंठे जमीन अद्याप न्यायालयाने मोजमाप करून दिलेली नाही. त्या जमिनीची मोजणीही झाली नसल्यामुळे जागा कुठपर्यंत आहे, हे कोणालाही माहिती नाही, ही बाब न्यायप्रविष्ट आहे. आता पाण्याच्या कुंडाजवळ फिल्टर बसवण्यावरून पुन्हा एकदा सागरेश्वर देवस्थान विरुद्ध केदारनाथ महाराज असा वाद पोलिस ठाण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांची आज तातडीची बैठक
मुख्य मंदिराच्या पाच फूट अंतरावर जर केदारनाथ भक्तगण अधिकार सांगायला लागले तर उद्या मंदिराचा ताबा घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. यासाठी गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सरपंच निर्मला बोडरे यांनी दिली.