कुपवाड येथील वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण अखेर महापालिकेने हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:50 PM2023-03-23T22:50:11+5:302023-03-23T22:50:25+5:30

प्रचंड पोलीस बंदोबस्त

The encroachment of the controversial place of worship at Kupwad was finally removed by the Municipal Corporation | कुपवाड येथील वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण अखेर महापालिकेने हटवले

कुपवाड येथील वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण अखेर महापालिकेने हटवले

googlenewsNext

सांगली/कुपवाड : कुपवाड येथील मंगलमूर्ती कॉलनी परिसरातील वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण अखेर गुरुवारी महापालिकेच्या पथकाने काढण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू होती. ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ही जागा खुली करण्यास सुरुवात झाली. या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने बेकायदेशीर बांधकाम काढल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंगलमूर्ती कॉलनीतील प्रार्थनास्थळाचा मुद्दा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यास मुंबईत झालेल्या सभेत मांडला होता. त्यानंतर रात्रीपासूनच या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी बंदोबस्तात वाढ करण्यात आली. महापालिका प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालत प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी विश्वस्तांनीही सहकार्याची भूमिका घेतली. कारवाई सुरू होताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे मिरज-माधवनगर रस्ता सूतगिरणीजवळ पोलिसांनी बंद केला होता. कुपवाड रस्त्यावरील विवेकानंद सोसायटीपासून येणाऱ्या मार्गावरही बंदोबस्त होता. रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. शेडच्या आत असलेले सर्व खोल्यांचे बांधकाम काढण्यात आले.

शेड, पाण्याच्या टाकीसह बांधकाम काढले- चहूबाजूंनी पत्रा मारण्यात आलेल्या या जागेत आत एक शेड, एक जुनी खोली, तीन स्वच्छतागृहे, दोन शौचालये, पाण्यासाठी प्लास्टिकची टाकी होती. महापालिकेच्या पथकाने बाहेरील पत्रावगळता आतील सर्व हटवले.

बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर- उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की, या जागेवर क्रीडांगण व प्राथमिक शाळेसाठी आरक्षण आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. तीन गुंठे जागेवर शेड उभारून वापर सुरू होता. याबाबत गुरूवारी सकाळी प्रार्थनास्थळाचे विश्वस्त, पोलिस व प्रशासनाची बैठक झाली. त्यात हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते काढण्यास सुरुवात केली.

उपायुक्तांना घेराव- सायंकाळी सातच्या सुमारास कारवाई संपली. त्यानंतर उपायुक्त पाटील मोटारीकडे जात असताना प्रार्थनास्थळाच्या बाहेर काही नागरिकांनी घेराव घातला. कारवाई कोणत्या आधारावर केली, याबाबत जाब विचारला. पोलिसांनी हस्तक्षेप करून उपायुक्तांना मोटारीत बसवून रवाना केले.

पोलीस छावणीचे स्वरूप- सकाळपासूनच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. दुपारनंतर त्यात वाढ करण्यात आली. परिसरातील उंच इमारतींवरही बंदोबस्त होता. तेथे येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच सोडले जात होते. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह सांगली, मिरजेतील सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते.

Web Title: The encroachment of the controversial place of worship at Kupwad was finally removed by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली