मिरजेत गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिकांनी ठोकले कुलूप
By अविनाश कोळी | Published: September 2, 2023 07:21 PM2023-09-02T19:21:47+5:302023-09-02T19:22:56+5:30
महापालिकेसोबत कराराचा वाद : आयुक्तांकडुन पाहणी
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव आपल्या मालकीचा असल्याचा फलक लावून माजी संस्थानिक गंगाधरराजे पटवर्धन यांनी तलावाच्या प्रवेशद्धारास कुलूप ठोकले आहे. गणेशोत्सव दोन आठवड्यावर आला असताना तलाव ताब्यात घेतल्याने महापालिका आयुक्तांनी तलावास भेट देऊन पाहणी केली.
मिरजेत शेकडो वर्षाची गणेश विसर्जन परंपरा असलेला तलाव संस्थानिक पटवर्धन यांच्या मालकीचा आहे. गणेश तलाव ही मिळकत श्रीमंत राजेसाहेब गंगाधरराव पटवर्धन मिरज सरकार यांच्या खासगी मालकी हक्काची मिळकत आहे. या मिळकतीत कोणीही विनापरवाना प्रवेश करू नये. प्रवेश केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देणारा फलक लावून प्रवेशद्वारास कुलूप लावले आहे.
पटवर्धन यांनी तलावाच्या सुशोभिकरण व देखभालीसाठी दहा वर्षापूर्वी महापालिकेसोबत करार करुन वार्षिक भाड्याने तलाव महापालिकेकडे सोपविला होता. या कराराची यावर्षी जून महिन्यात मुदत संपल्यानंतर कराराच्या नूतनीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिका प्रतिसाद देत नसल्याने तलाव पुन्हा ताब्यात घेतल्याचे पटवर्धन यांचे वकील श्रीकृष्ण पोतकुळे यांनी सांगितले. मात्र तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन तलावात होईल. मात्र विसर्जन व्यवस्थेसाठी आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेची अडचण होणार आहे.