Sangli Crime: भाजपचा माजी उपनराध्यक्षच जतमधील माजी नगरसेवकाच्या खुनाचा सूत्रधार, चौघांना अटक
By शीतल पाटील | Published: March 20, 2023 05:13 PM2023-03-20T17:13:50+5:302023-03-20T17:14:11+5:30
भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा शुक्रवारी (ता. १७) गोळ्या झाडून व दगडाने ठेचून भरदिवसा खून करण्यात आला होता
सांगली : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्या खुनामागे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी अटक केलेल्या चार संशयितांनी सावंत याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली दिली आहे. संशयित सावंत पसार असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. खुनामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
ताड खूनप्रकरणी बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण (२७, रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने (२४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (२४, रा. के. एम. हायस्कूलजवळ, सातारा फाटा, जत) आणि किरण विठ्ठल चव्हाण (२७, रा. आर. आर. कॉलेजजवळ, जत) या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.
याबाबत माहिती अशी की, भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची शुक्रवारी (ता. १७) येथील अल्फोन्सो स्कूलजवळ गोळ्या झाडून व दगडाने ठेचून भरदिवसा खून करण्यात आला. याप्रकरणी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तैनात होती. याप्रकरणी संशयित संदीप ऊर्फ बबलू चव्हाण याच्यासह साथीदारांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल केला.
संदीप चव्हाण हा रेकॉर्डवरील असल्याने पोलिसांचा संशय बळावला. संशयितांची माहिती घेत असताना संशयित चौघे गोकाक (रा. कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक निशाणदार यांचे पथक तत्काळ त्याठिकाणी गेले. चौघांनाही गोकाक बसस्थानाकावरून ताब्यात घेण्यात आले. चौघांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत (ता. जत) याच्या सांगण्यावरून ताड यांचा खून साथीदारांसह केल्याची कबुली संदीप चव्हाण याने पोलिसांना दिली.
संशयित तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार
अटक करण्यात आलेल्या चौघापैकी तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बबलु उर्फ संदीप चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे सहा गंभीर गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत. २०१८ मध्ये त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. निकेश उर्फ दाद्या मदने याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी असे चार गंभीर गुन्हे विश्रामबाग, सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण, जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा एक गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल आहे.