सांगलीकरांचा वनवास वाढणार, नव्या पुलाचा नारळ फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

By अविनाश कोळी | Published: July 8, 2024 09:14 PM2024-07-08T21:14:22+5:302024-07-08T21:14:36+5:30

जुना बुधगाव रस्त्यावरील वाहतूक वळविली

The exile of Sanglikar will increase, the coconut of the new bridge will burst! Collector's green light | सांगलीकरांचा वनवास वाढणार, नव्या पुलाचा नारळ फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

सांगलीकरांचा वनवास वाढणार, नव्या पुलाचा नारळ फुटणार! जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनमार्फत जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामास हिरवा कंदील दाखविल्यामुळे येत्या १३ जुलैपासून येथील वाहतूक वळविण्यात येणार आहे.

जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९वर नवा उड्डाणपूल होणार आहे. केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम्’ या योजनेंतर्गत हा पूल होत आहे. हा रस्ता चिंतामणीनगर उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात होता. त्यावरही आता कोंडी होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सोमवारी या पुलाच्या कामास परवानगी दिली. सामाजिक न्याय भवनापासून रेल्वे गेट तसेच पंचशीलनगरपर्यंत रस्त्याच्या अर्ध्या भागात काम व अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. दुचाकी व तीनचाकींसाठी हा रस्ता खुला राहणार आहे.

चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून जुना बुधगाव रस्त्याचा वापर सुरू झाल्याने येथील उड्डाणपुलाचे काम थांबविले होते. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते कधी पूर्ण होईल, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही. अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.

विद्यार्थी वाहतूक अडचणीची

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शेकडो रिक्षा याच मार्गावरून ये-जा करीत असतात. आता निम्मा रस्ताच वाहतुकीस मिळणार असल्याने दुचाकी व रिक्षांच्या गर्दीमुळे वाहतूक कसरतीची होणार आहे.

अतिक्रमणे तशीच, काम सुरू

जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी महिन्यापूर्वी जुना बुधगाव रस्त्यावर पाहणी केली होती. त्यावेळी महारेलच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या पूर्ण मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता ताब्यात घेण्याबाबत चर्चा केली होती. महापालिका व महारेलने याचे नियोजन करावे, अशी सूचना दिली होती. अद्याप या मार्गावरील अतिक्रमणे तशीच आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

४८ कोटी रुपये मंजूर

या उड्डाणपुलासाठी ४८ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. तितक्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ४५० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभर नागरिकांचे हाल होणार आहेत. ११.५ मीटर रुंदीचा हा पूल असेल.

पूर आल्यास हाल

रखडलेला चिंतामणीनगरचा रेल्वे उड्डाणपूल, कामाचा नारळ फोडलेला जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल यामुळे यंदाचा पावसाळा सांगलीकरांसह जिल्ह्याच्या उत्तरेकडील नागरिकांसाठी वेदनादायी होणार आहे. यावर्षी अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविल्याने पुराचे संकट सांगलीकरांच्या डोईवर दाटले आहे. पुराच्या प्राथमिक टप्प्यातच जुना बुधगाव रस्ता व कर्नाळ रस्ता बंद होत असल्याने नागरिकांना गावाला वळसा घालून ये-जा करावी लागेल.

Web Title: The exile of Sanglikar will increase, the coconut of the new bridge will burst! Collector's green light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली