मागील हिशेब द्या, मगच साखर कारखाने सुरू करा - राजू शेट्टी
By अशोक डोंबाळे | Published: September 8, 2023 06:17 PM2023-09-08T18:17:39+5:302023-09-08T18:21:50+5:30
येत्या बुधवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा
सांगली : मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाचा हिशेब दिल्याशिवाय यावर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाचे एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याने एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये दिले आहेत. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीवर ४०० रुपये दिले नाहीत. वास्तविक पाहता गतवर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते, त्यावेळी साखर प्रतिक्विंटल तीन हजार १०० रुपये होती. ती गृहित धरून दराची मागणी केली होती. सध्या साखर प्रतिक्विंटल तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रुपये आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला ७०० रुपये जादा मिळत आहेत.
त्यामुळे गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला एफआरपीपेक्षा ४०० रुपये कारखान्यांनी दिलेच पाहिजेत. कारखान्यांनी मागील गळीत हंगामाचा हिशेब द्यावा, त्यानंतरच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करावेत. या मागणीसाठी कोल्हापुरात १३ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. तरीही कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरीच कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळ जाहीर करा
यंदा पाऊस नाही, खरीप वाया गेला आहे. जे नुकसान झाले ते भरून निघणारे नसल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत विमा योजनेची शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. पण, सरकारच्या मध्यस्थीने विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा आंदोलनास पाठींबा
मराठा आरक्षणाचा संसदेमध्ये २०११ मध्ये सर्वप्रथम मी प्रश्न मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. आरक्षणासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. राज्यातील ९५ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मराठा समाजापुढे आर्थिक दारिद्र्य निर्माण झाले आहे. समाजाला भक्कम करायचे असेल तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.