लढायचे मी कधीच सोडणार नाही, संजय राठोडांविरुद्ध लढा सुरूच राहणार - चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:35 PM2022-12-16T13:35:42+5:302022-12-16T13:36:12+5:30
सोशल मीडियावर सध्या विकृतपणा वाढला, कठोर कायदा करण्याची गरज
सांगली : मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील माझा लढा पूर्वी रस्त्यावरचा होता. आता न्यायालयीन स्तरावर सुरू आहे. याचिकेवरील सुनावणी सुरू असून, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, आता राठोडप्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला, तेव्हा का आवाज का उठवला नाही? या प्रकरणात राठोड यांना क्लीन चिट तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. पक्ष कोणताही असो, मी लढणारी महिला आहे. लढायचे मी कधीच सोडणार नाही.
लव्ह जिहादबद्दल त्या म्हणाल्या की, १८ वर्षांनंतर मुलींना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, मात्र अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकारास अटकाव घालण्यासाठी लव्ह जिहादचा कायदा व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर किंवा शासन पातळीवर दुर्लक्ष झाले असेल तर त्याविषयी मी पाठपुरावा करेन. हे प्रकरण गंभीर असून ते तडीस नेईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर विकृतपणा
सोशल मीडियावर सध्या विकृतपणा वाढला आहे. त्याचा मलाही खूप त्रास झाला. सर्वांनाच तो होत असल्याने त्याविषयी कठोर कायदा करण्याची गरज आहे, असे मत वाघ यांनी व्यक्त केले.