पहिले लग्न लपवून दुसरे केले, सांगलीत महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा
By संतोष भिसे | Published: October 17, 2024 04:00 PM2024-10-17T16:00:20+5:302024-10-17T16:02:39+5:30
सांगली : पहिला विवाह लपवून ठेवून दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याप्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९, रा. इनाम ...
सांगली : पहिला विवाह लपवून ठेवून दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याप्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९, रा. इनाम धामणी, ता. मिरज) या महिलेविरोधात सांगली ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्याविरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. आष्टा) यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंदना ही सांगली पोलिस दलात सेवेत आहे.
वंदना हिच्यासोबत जनाबाई चंद्राप्पा कांबळे (वय ६०), राजशेखर चंद्राप्पा कांबळे (वय ४२), उषा शंकर माळी (वय ४०, सर्व रा. इनाम धामणी) यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरी करतात. त्यांचा विवाह वंदना हिच्याशी २२ जून २०२२ रोजी झाला होता. विवाहानंतर आठवडाभरातच म्हणजे ३० जूनरोजी ती माहेरी इनाम धामणीला निघून आली. महेश यांचे मामा सुहास पठाणे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन महेश हे वैवाहिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत अशी तक्रार केली.
मी नांदण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. महेश व त्यांच्या कुटुंबाने माझी फसवणूक केली, त्याबद्दल नऊ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. पैसे न दिल्यास खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. यादरम्यान, वंदना, जनाबाई, राजशेखर व उषा यांनी महेशच्या घरी माणसे पाठवून दिली. महेशच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.
दरम्यान, महेश यांनी न्यायालयात तक्रार केली की, वंदना हिच्या आरोपांमुळे आपल्या लौकिकास बाधा पोहोचली आहे. वंदनाविषयी चौकशी केली असता तिचा पहिला विवाह सांगलीतील संजय राजाराम शिंदे (रा. वखारभाग) यांच्याशी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी वंदना व अन्य तिघा संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले.