सांगलीत शिवचरित्राचे उर्दूतील पहिले भित्तीपत्रक; मोडी, उर्दूमधून शिवरायांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:16 PM2022-06-09T13:16:53+5:302022-06-09T13:17:16+5:30

सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय असे भित्तीपत्रक करणारे राज्यातील पहिले ठरले आहे

The first Urdu poster of Shivcharitra at Mathubai Garware Girls College in Sangli | सांगलीत शिवचरित्राचे उर्दूतील पहिले भित्तीपत्रक; मोडी, उर्दूमधून शिवरायांना मानवंदना

सांगलीत शिवचरित्राचे उर्दूतील पहिले भित्तीपत्रक; मोडी, उर्दूमधून शिवरायांना मानवंदना

googlenewsNext

सांगली : एकाचवेळी मोडी व उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तीपत्रकाच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाने केला. असे भित्तीपत्रक करणारे राज्यातील हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. उर्दूसह मोडी लिपीतूनही भित्तीपत्रके तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवराज्याभिषेक दिनानिमित मोडी लिपी आणि उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मांडले आहे. प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्यावतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम करण्यात येतो. दरवर्षी महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचा जीवनपट मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात येतो.

प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. ऊर्मिला क्षीरसागर, मोडीशिक्षक मानसिंगराव कुमठेकर हे या उपक्रमाचे संयोजन करतात. मोडी वर्गाच्या विद्यार्थिनी शिवजयंतीनिमित्त ‘शिवस्मरण’ हे अभिनव भित्तीपत्रक करतात.

यंदा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोडी आणि उर्दू लिपीतून भित्तीपत्रक करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे ३० हून अधिक लेख मोडी लिपी आणि उर्दूमधून लिहिले आहेत. जिया बारगीर, अलबिया पीरजादे, नमेरा कुरणे, जोया मुल्ला यांनी उर्दूमध्ये, तर वेदश्री जोशी, जान्हवी तानवडे, काजल पांढरे, प्रणाली कांबळे, हर्षदा पुजारी, स्नेहल कांबळे, वैष्णवी संकपाळ, धनश्री आंबले, आर्या खेडेकर, मुस्कान मुजावर, प्रणाली रेडेकर, गिरीजा फडणीस, दीया पाटील, अंजली चोथे, राधिका कांबळे, नीलम इंगळे, प्रियांका म्हारगुडे, श्रेया देशमुख, सोनाली पाटील, सानिका कांबळे, डॉ. वैशाली कुलकर्णी, वैष्णवी पिसे या विद्यार्थिनींनी मोडी लिपीतील लेख लिहिले आहेत.

या अभिनव भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते केले. यावेळी डॉ. नंदिनी काळे, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी मोडी लिपीतील अक्षरांची रांगोळीही रेखाटण्यात आली होती.


लेखांमध्ये माहितीचा खजाना

शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे भाषाविषयक धोरण, अशा विविध विषयांवर मोडी आणि उर्दूमध्ये लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले आहेत.

Web Title: The first Urdu poster of Shivcharitra at Mathubai Garware Girls College in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.