सांगलीत पूरपातळी ६ इंचांनी उतरली, कोयनेतून विसर्ग कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:13 PM2024-08-05T13:13:46+5:302024-08-05T13:14:08+5:30
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी चोवीस तासांत ६ इंचांनी घटली आहे. कोयना व अलमट्टी धरणातून विसर्ग कायम असून, पाणीपातळी स्थिर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगली जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार सरासरी ३.३ मिमी पाऊस झाला. शिराळा तालुक्यात १८.७ मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदला आहे. शनिवारी रात्री आठ वाजता सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३९.११ फूट इतकी होती. रविवारी रात्री आठ वाजता ती ३९.५ फूट झाली. पाणीपातळीत कधी घट, तर कधी वाढ होत असल्याने पूरग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था आहे.
कोयना धरणातून अद्याप ५२ हजार १०० क्युसेकने, तर अलमट्टीतून २ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार ५९ मिमी पावसाची, तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात २५ मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
सांगली जिल्ह्यातील पूरपातळी
बहे १२.५
ताकारी ४२.१०
भिलवडी ४१
आयर्विन ३९.५
अंकली ४४.७
म्हैसाळ ५२.८