पहिल्या दिवशीच फुलांचा बाजार कोमेजला, प्लास्टिक फुलांनी खाल्ला भाव
By अविनाश कोळी | Published: August 31, 2022 09:52 PM2022-08-31T21:52:48+5:302022-08-31T21:54:03+5:30
उत्सवाच्या पहिल्याद दिवशी दरात मोठी घसरण :
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून किलोला २५० रुपयांवर गेलेला फुलांचा भाव गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घसरला. झेंडू, शेवंतीच्या फुलांच्या दरात प्रतिकिलो तब्बल १५० रुपयांची घसरण झाली. नैसर्गिक फुलांचा बाजार कोमेजला असताना प्लास्टिक फुलांचा बाजार बहरल्याचे चित्र दिसून आले.
सांगलीच्या मारुती रोड, हरभट रोडवर गेल्या तीन दिवसांपासून फुलांची मोठी उलाढाल होत होती. उत्सवाच्या पहिल्या दिवशीही चांगला भाव मिळेल, अशी विक्रेते व उत्पादकांना अशा होती. पहाटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाव टिकून होता. मात्र दुपारनंतर अचानक फुलांची मागणी घटल्याने कमी दरात फुलांची विक्री सुरु झाली. २४० रुपये किलोवरुन झेंडू थेट १०० रुपये किलोवर आला तर पिवळी व पांढरी शेवंतीचा दर २८० वरुन थेट १५० रुपये किलोपर्यंत खाली आला. यंदा फुलांची आवकही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आवक वाढत असताना मागणीमध्ये घट नोंदली गेली. त्यामुळे दर घसरले. निशिगंध, जर्बेरा, गुलाब या फुलांचे दर स्थिर राहिले.
आरास साहित्याची मोठी उलाढाल
सांगली शहरात आरास साहित्याची मोठी उलाढाल गेल्या तीन दिवसांत झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशीसुद्धा दिवसभर आरास साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गणपती पेठ, हरभट रोड, बालाजी चाैक, मारुती रोड याठिकाणी गर्दी केली होती.