सांगलीतल्या बिसूर येथे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाने लावला कॅमेरा
By संतोष भिसे | Published: July 5, 2023 04:09 PM2023-07-05T16:09:28+5:302023-07-05T16:09:56+5:30
`किमान पगारापुरते तरी काम करा`
सांगली : बिसूर (ता. मिरज) येथे बिबट्याच्या शोधासाठी वन विभागाने कॅमेरा लावला आहे. दरम्यान, मंगळवारी किंवा बुधवारी दिवसभरात बिबट्याचे कोणतेही अस्तित्व कॅमेऱ्यात टिपले गेले नाही, शिवाय ग्रामस्थांनाही त्याचे दर्शन झाले नाही.
मंगळवारी पहाटे बिसूरमध्ये एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. भर वस्तीत तो फिरत असल्याने शेतकरीही हवालदिल झाले. गावाचा संपूर्ण परिसर दाट ऊसशेतीने वेढला आहे. शिवाय कर्नाळ, कावजी खोतवाडी या लगतच्या गावांपर्यंतही सर्वत्र दाट वनराई, ओढे, नाले व ओघळी आहेत. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी बराच वाव आहे. मंगळवारी पहाटे तो कॅमेऱ्यात दिसल्यानंतर अन्यत्र कोठेही थांग लागला नाही. काही तरुणांनी माग काढण्याचा प्रयत्न केला, पण शोध लागला नाही.
दत्त मंदिराशेजारील ओघळीमध्ये तो लपल्याची शंका होती, त्यामुळे वन विभागाने ओघळीच्या एका टोकाला कॅमेरा लावला आहे. ओघळ सुमारे ४०० ते ५०० फूट लांबीची असल्याने या कॅमेऱ्यात बिबट्या कैद होण्याची शक्यता कमी आहे. कर्नाळ रस्त्यावरील ऊस शेतीत किंवा वनराईत तो लपल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, बिबट्याने गावात कोणावरही हल्ला केलेला नाही. गोठ्यातील जनावरे किंवा कुत्र्यांवरही हल्ला केल्याची घटना नाही. तथापि एखादे मोकाट कुत्रे फस्त करुन बिबट्या निघून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
`किमान पगारापुरते तरी काम करा`
दरम्यान, मंगळवारी सकाळी बिबट्याचे अस्तित्व लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने वन विभागाशी तातडीने संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामस्थांनी पोलिस खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. त्यांनी वन विभागाला दूरध्वनी केल्यानंतर सायंकाळी एक अधिकारी ग्रामपंचायतीत आला. बिबट्याच्या अस्तित्वाची कोणतीही छानबीन न करता `ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी` असे सांगणारे एक पत्र दिले आणि औपचारिकता पूर्ण केली. त्यामुळे सरपंच सतीश निळकंठ यांचा अधिकाऱ्याशी जोरदार वाद झाला. `किमान पगारापुरते तरी काम करा` असे निळकंठ यांनी सुनावले.