कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

By हणमंत पाटील | Published: October 28, 2023 04:26 PM2023-10-28T16:26:01+5:302023-10-28T16:52:06+5:30

पाटबंधारे विभागाच्या नियोजनाचे तीनतेरा

The gates of Kolhapuri dam are broken, how will Sangli store the water released from the corner? | कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे तुटलेले, कोयनेतून सोडलेले पाणी सांगली साठविणार कशी?

हणमंत पाटील

सांगली : सांगलीकरांची तहान भागविण्यासाठी अखेर कोयनेतून १०५० क्युसेक पाणी शुक्रवारी सोडण्यात आले. तरीही कृष्णेत सोडलेले पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन नाही. शहरातील आयर्विन ब्रीजच्या बाजूला असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे गंजले असून, ते तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे कृष्णेत आलेले पाणी साठविण्यास पाटबंधारे विभाग असमर्थ असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

पावसाने ताण दिल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. जिल्ह्यातील नदीकाठावरील पिके सुकून जाऊ लागली. शिवाय शहराला केवळ पाच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांनी कोयनेतून पाणी सोडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांना विदर्भ दौरा सोडून शुक्रवारी सांगलीत दाखल व्हावे लागले. शिवाय सकाळी कोयनेतून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. आता हे पाणी दोन दिवसांत सांगलीत दाखल होईल; परंतु पाणी साठविण्यासाठी सांगली पाटबंधारे विभाग अकार्यक्षम असल्याची वस्तुस्थिती आहे.

कोयनेने दिले, पण कृष्णेत वाया..

एका बाजूला सांगलीकरांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे कृष्णेत पाणी सोडण्यात आले; मात्र हे पाणी साठविण्यास सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाची यंत्रणा सक्षम नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शुक्रवारी शहरातील कोल्हापूर बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेरी नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले. तसेच, कचरा, प्लास्टिक, माती व वाळूने बंधारा भरला आहे. त्यामुळे पाणी साठविण्याची बंधाऱ्याची क्षमता राहिलेली नाही. तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याला बसविलेले लोखंडी दरवाजे गंजले आहेत. अनेक ठिकाणी दरवाज्याला मोठी छिद्रे पडून ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची विदारक स्थिती आहे.

सांगलीतील पाटबंधारे विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे जुने झाले आहेत. त्यामुळे नवीन दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. - आदित्य मोहिते, शाखा अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग.
 

गेल्या अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला नवीन दरवाजे बसविण्याची आम्ही मागणी करतोय; परंतु शहर व जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयी सत्ताधारी नेते व प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नाही. ढिम्म प्रशासनावर कारवाई करून तातडीने नवीन दरवाजे बसविले पाहिजेत. - संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.

Web Title: The gates of Kolhapuri dam are broken, how will Sangli store the water released from the corner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.