सांगलीतील कामेरीत सापडलेल्या गव्याचा अखेर मृत्यू, वनअधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप
By श्रीनिवास नागे | Published: December 6, 2022 05:23 PM2022-12-06T17:23:36+5:302022-12-06T17:24:11+5:30
पाऊस आणि ऊस क्षेत्रात जास्त काळ लपून बसल्याने आजारी असलेल्या या गव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला
सांगली : कामेरी (ता. वाळवा) येथे आढळलेला गवा काल, सोमवारी वन विभागाने ताब्यात घेतला, मात्र रात्री उशिरा त्याचा वन विभागाच्या इस्लामपूर येथील कार्यालयात मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच गव्याचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कामेरी येथील शेती पाणीपुरवठा योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या परिसरात शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी ऊसशेतीत काही शेतकऱ्यांना गवा दिसला. त्यांनी तात्काळ वनखात्याला कळविले. त्यानंतर वनविभागाच्या दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी गावात येत गव्याच्या बंदोबस्तासाठी मोहीम उघडली; परंतु त्यांना तो पकडता आला नाही.
अखेर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी याबाबत वनक्षेत्रपाल सचिन जाधव व वनपाल सुरेश चरापले यांना दूरध्वनीवरून या गव्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी या कर्मचाऱ्यांचा दूरध्वनी घेतला नाही. त्यातच रविवार, दि. ४ रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. ऐन पावसात एक महिला कर्मचारी आणि काही कर्मचारी गव्याला ताब्यात घेण्यासाठी गस्त घालत होते. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते.
अखेर संबंधित महिला कर्मचाऱ्याने थेट सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांना मोबाइलवरून माहिती दिली. त्यांनी तातडीने शिराळा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या कालावधीत गव्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्याची प्रकृतीही नाजूक बनल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.
काल, सोमवारी (दि. ५) वनखात्याने त्याला पकडून क्रेनच्या साहाय्याने वाहनात घालून इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील वन खात्याच्या कार्यालयात आणले. पाऊस आणि ऊस क्षेत्रात जास्त काळ लपून बसल्याने आजारी असलेल्या या गव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु सोमवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी माहिती देताच वनअधिकाऱ्यांनी गांभीर्य राखून त्यास वेळेवर पकडले असते, तर त्याचा मृत्यू झाला नसता, अशा प्रतिक्रिया कामेरी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.