Sangli: ..अखेर चिंतामणीनगर पुलाचा गर्डर भिंतींवर विसावला
By अविनाश कोळी | Published: June 27, 2024 04:33 PM2024-06-27T16:33:30+5:302024-06-27T16:34:35+5:30
युद्धपातळीवर काम : ऑगस्टमध्ये पूल खुला करण्याची तयारी
सांगली : राजकीय कळीचा मुद्दा बनलेल्या सांगलीच्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर गुरुवारी भिंतींवर विसावला. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुलाच्या बाजूच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर गर्डर बसणार तरी कधी, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अखेर या गर्डरला मुहूर्त मिळाला. बड्या क्रेनच्या साहाय्याने गर्डर ठेवण्यात येत आहेत. हे गर्डर विसावल्यानंतर पुलाच्या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली आहे. त्यामुळे या मुदतीत ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम करून पूल खुला करावाच लागेल. यापुढे मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतली गेल्याने काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाअंतर्गत वर्षभरापूर्वी सांगलीचा हा उड्डाणपूल पाडण्यात आला होता. जानेवारीअखेरीस या पुलाच्या कामास मुदत देण्यात आली होती. मात्र, पुलाचे काम सतत रेंगाळत राहिले. प्रशासकीय स्तरावर कामाच्या मुदतवाढीचा खेळ रंगला. त्यामुळे नागरिकांचे या पुलाविना पर्यायी मार्गावरून हाल होत आहेत. पर्यायी मार्ग मोठे व चांगले नसल्याने अडचणी वाढल्या आहे. यातच यंदा पुराचा धोकाही वर्तविला जात नसल्याने नागरिकांची चिंता वाढली होती.
जुना बुधगाव रस्ता व कर्नाळ रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. हे दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यात बंद होतात. त्यामुळे ये-जा करायची तरी कशी अशी चिंता नागरिकांना सतावत आहे. पुलाचे गर्डर आता बसविण्यात येत असले तरी आणखी दीड महिन्याचा कालावधी पूर्ण कामासाठी लागू शकतो. त्यामुळे यंदाचा पावसाळा नागरिकांना वनवास भोगावाच लागणार आहे. याच पुलाच्या रेंगाळलेल्या कामावरून सध्या भाजप व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. पुलाच्या या कामासाठी पूर्वी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. बांधकामाच्या रचनेत केलेल्या बदलामुळे खर्च वाढला आहे.