हळदीचे ब्रॅण्डिंग सांगलीला, संशोधन केंद्र मात्र हिंगोलीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:34 PM2022-09-17T16:34:49+5:302022-09-17T16:35:07+5:30

हळदीची प्रमुख बाजारपेठ असणारा सांगली जिल्हा मात्र दुर्लक्षितच

The government approved the establishment of the first Turmeric Research Center in Maharashtra at in Wasmat Hingoli District | हळदीचे ब्रॅण्डिंग सांगलीला, संशोधन केंद्र मात्र हिंगोलीला

हळदीचे ब्रॅण्डिंग सांगलीला, संशोधन केंद्र मात्र हिंगोलीला

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : महाराष्ट्रातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत (जि. हिंगोली) येथे स्थापन करण्यास शासनाने बुधवारी (दि. १४) मंजुरी दिली. १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. हळदीची प्रमुख बाजारपेठ असणारा सांगली जिल्हा मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. राजकीय पाठबळाअभावी बाजारपेठेचा विस्तार खुंटला असून, देशात अन्यत्र पर्यायी बाजारपेठा विकसित होऊ लागल्या आहेत.

वसमत (जि. हिंगोली) येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. ते पहिलेच शासकीय केंद्र असेल. राज्यात अन्यत्र खासगी स्तरावर लहान-मोठी संशोधन केंद्रे आहेत, पण शासकीय नाही. सांगलीत हळदीचे उत्पादन तुलनेने कमी असले, तरी गुणवत्तेत मात्र हळद सरस आहे. तिच्या विकासासाठी मसाले बोर्ड, हळद प्रयोगशाळा, व्यापारवृद्धीसाठी पारदर्शी यंत्रणा, संशोधन केंद्र या बाबी आवश्यक आहेत.

मराठवाड्यात हळदीच्या विकासासाठी हेतूपुरस्पर प्रयत्न होताना दिसतात. तेथील उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे राज्यभरातील हळद व्यापारी व्यापारी पेढ्या सुरू करीत आहेत. सांगलीत जागा, मजुरी, करआकारणी या बाबी खर्च वाढविणाऱ्या आहेत. मराठवाड्यात दोन टक्के अडत असताना, सांगलीत तीन टक्के भरावी लागते. बाजार समितीत आलेल्या मालाचा सौद्यानंतर तत्काळ उठाव न होता तो पडून राहतो. यामुळे हळद बाजारपेठेला पुरेशी व्यावसायिकता आलेली नाही. संशोधन केंद्रामुळे तिला चालना मिळाली असती; पण राजकीय अनास्थेमुळे तेदेखील मिळाले नाही.

असा आहे हळदीचा विस्तार

  • जगातील ८१ टक्के हळदीचे क्षेत्र एकट्या भारतात
  • २०१९-२० मध्ये देशभरात २.१९ लाख हेक्टरवर हळदीची लागवड
  • त्यापैकी ५४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात
  • सन २०२१-२२ मध्ये राज्यात १ लाख २ हजार हेक्टर क्षेत्र हळदीखाली
  • त्यापैकी ८० टक्के म्हणजे ८२ हजार ९ हेक्टर हळद मराठवाड्यात


हिंगोलीमध्ये चालना मिळणार

वसमत येथील संशोधन केंद्राद्वारे हळदीचे चांगले बियाणे, उत्पादन वाढ, रोग निर्मूलन, यांत्रिकीकरण, विपणन, निर्यात आदीला चालना मिळणार आहे. सांगलीला मात्र ही संधी मिळणार नाही.


सांगलीच्या हळद बाजारपेठेची राजकीय पाठबळाअभावी पीछेहाट सुरू आहे. उत्पादन वाढावे, त्याची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी कोणतेही प्रयत्न प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींच्या स्तरावर होताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील शेतीचे बलस्थान ठरलेल्या बेदाण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. ही अनास्था जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरणारी आहे. - हार्दिक सारडा, हळद व्यापारी, सांगली

Web Title: The government approved the establishment of the first Turmeric Research Center in Maharashtra at in Wasmat Hingoli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली