सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच
By अशोक डोंबाळे | Published: July 27, 2024 03:25 PM2024-07-27T15:25:38+5:302024-07-27T15:26:35+5:30
अलमट्टीतून तीन लाख क्यूसेक विसर्ग : जिल्ह्यात , धरण क्षेत्रात जोर कमी
सांगली : वारणा (चांदोली), कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोयना धरण ७८.८४ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने ४०.२ फुटांपर्यंतची इशारा पातळी शनिवारी दुपारी ओलांडली आहे. वारणा धरण ८८ टक्के भरल्यामुळे तेथूनही १६ हजार ७८५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून तीन लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणात सद्या ८२.९९ टीएमसी पाणी झाला झाला असून ७८.८४ टक्के धरण भरले आहे. शनिवारी कोयना धरणातून ३२ हजार १०० क्यूसेक विसर्ग चालू आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जादा १० हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्याचा निर्णय रद्द केला आहे. वारण धरणात ३०.३६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ८२.९९ टक्के भरले आहे. धरणातून १६ हजार ७८५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. धरणात ७६.७० टीएमसी पाणीसाठा असून ६२ टक्के धरण भरले आहे. धरणात दोन लाख १८ हजार २३० क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणातून तीन लाख क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात ११.४ मिलीमीटर
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ११.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४८.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २४ तासातील पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ४.३ (४२४.७), जत ०.३ (२७२), खानापूर ३.३ (३४०), वाळवा २२.७ (६६५.१), तासगाव ३.७ (४१९.३), शिराळा ४८.१ (९९१.६), आटपाडी ४.४ (२४७.७), कवठेमहांकाळ १ (३७५.९), पलूस ६.९ (४५८.८), कडेगाव १०.४ (४४५).
जिल्ह्यातील पाणीपातळी
पाणी पातळी - फूट इंचांमध्ये
कऱ्हाडचा कृष्णा पूल २५.०९
बहे पूल १२.०८
ताकारी पूल ४३.७
भिलवडी पूल ४२.०८
आयर्विन ४०
अंकली पूल ४४.७
म्हैसाळ बंधारा ५१.९
राजापूर बंधारा ५०.०९
धरणामध्ये शनिवारचा पाणीसाठा
धरण - आजचा पाणीसाठा - धरणाची क्षमता
कोयना - ८२.९९ - १०५.९९
धोम - ९.९५ - १३.५०
कन्हेर - ८.४० - १०.१०
वारणा - ३०.३६ - ३४.४०
दूधगंगा - २१.२४ - २५.४०
राधानगरी - ८.३२ - ८.३६
तुळशी - ३.२५ - ३.४७
कासारी - २.२८ - २.७७
पाटगांव - ३.५९ - ३.७२
धोम-बलकवडी - ३.३६ - ४.०८
उरमोडी - ६.६० - ९.९७
तारळी - ५.१० - ५.८५
अलमट्टी - ७६.७० - १२३.०८