गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सांगलीतील साडेअकरा हजार लोकांवर ताबा सिद्धचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:14 PM2023-03-01T12:14:53+5:302023-03-01T12:15:13+5:30
गायरान जमिनीवर घरे असणाऱ्यांचे धाबे दणाणले
सांगली : गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण कारवाईवर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच जिल्ह्यातील ११ हजार ४५५ गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना शासन पुन्हा नव्याने नोटिसा बजावणार आहे. या नोटिशीनुसार अतिक्रमणकर्त्यांना ३० दिवसांत ताबा सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यासह खुलासा द्यावा लागणार आहे. समाधानकारक उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत कारवाई करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित केली होती. या समितीत संबंधित तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचा समावेश होता. त्यानुसार जिल्ह्यात गायरान जमिनीमध्ये ११ हजार ४६८ बांधकामे झाली आहेत. जवळपास १० हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर बांधकामे झाली असून, ही हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार होती. शासकीय ३९५.४७ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमणे झाली आहेत.
ही अतिक्रमणेही हटवून जमिनी ताब्यात घेण्यात येणार होत्या. पण, गायरान जमिनीवरील बांधकाम संदर्भात राज्य सरकारने पाठविलेल्या नोटिशींविरोधात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार पुन्हा गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटावची माेहीम राबविली जाणार आहे. गायरान जमिनींवरच्या अतिक्रमण कारवाईवर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना पुन्हा नव्याने नोटीस बजावली जाणार आहे. नोटिशीला ३० दिवसांत उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, नोटिशीमध्ये अतिक्रमण असणाऱ्या व्यक्तीला त्या जागेवरील ताबा सिद्ध करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत अतिक्रमण करणाऱ्यांनी ताबा सिद्ध केला नाही, तर ६० दिवसांनंतर पुन्हा कारवाई सुरू करण्याची सूचना हायकोर्टाने दिली.
गायरान जमिनीवर घरे असणाऱ्यांचे धाबे दणाणले
गायरान जमिनीवरील घरे असणाऱ्यांनी ३० दिवसांत ताबा सिद्ध न केल्यास त्यांच्या घरावर बुलडोझर चालणार आहे. यामुळे गायरान जमिनीवर घर असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात अशी आहेत अतिक्रमणे
तालुका - गायरान जमिनीतील बांधकामे
मिरज ३,५३६
तासगाव २,३८७
क. महांकाळ १,५५०
जत ५३३
खानापूर ४५४
आटपाडी २४७
कडेगाव १,०९३
पलूस १८८
वाळवा १,३६३
शिराळा १९७
एकूण ११,४६८