राज्यातील शेवटचा मतदार पहिल्यांदाच करणार मतदान; कर्नाटक सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगार बजावणार उद्या मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:32 AM2024-05-06T09:32:47+5:302024-05-06T09:33:10+5:30
सुशिक्षित बेरोजगार असल्याने पोलिस भरतीची तयारी करतोय.
- हणमंत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदार यादीतील शेवटचा मतदार मंगळवारी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. सांगलीच्या पूर्वभागातील दुष्काळी जत तालुक्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागातील कोंत्यावबोबलाद या छोट्या गावात २१ वर्षांचा अरबाज शब्बीर पटेल राहतो. गेल्या वर्षी तो बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवीधर झाला. सुशिक्षित बेरोजगार असल्याने पोलिस भरतीची तयारी करतोय. पण, आई-वडील शेती करीत असल्याने रिकामे बसण्यापेक्षा तो एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो आहे.
तालुक्याची मागणी रखडली
कोंत्यावबोबलाद हे संख या बाजारपेठेजवळील सीमावर्ती गाव आहे. या गावाच्या ३ किलोमीटरवर कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा सुरू होतो.
मात्र, जत हे तालुक्याचे ठिकाण ५५ किलोमीटर आणि सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण १२४ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी येथील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या नागरिकांच्या सोयीसाठी संख हा वेगळा तालुका करण्याची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे.
आमचा संख भाग दुष्काळी असल्याने पावसाच्या पाण्यावर बेभरवशी शेती आहे. कुठेच नोकरी मिळेना म्हणून पोलिस भरतीची तयारी करतोय. मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. शेतीसाठी पाण्याचा आणि सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार आहे.
- अरबाज शब्बीर पटेल,
शेवटचा मतदार