Sangli: लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू, दुष्काळी फोरमच्या नेत्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:11 PM2024-09-25T17:11:46+5:302024-09-25T17:12:16+5:30
बाहेरचा उमेदवार चालणार नाही, जतमधील बैठकीत रणनीतीवर चर्चा
जत : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या दुष्काळी फोरममधील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीतही ताकद दाखवण्याचा इशारा दिला आहे. यासाठी फोरममधील काही नेत्यांची बैठक जत येथे विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी जगताप यांच्यासह पृथ्वीराज देशमुख व अजितराव घोरपडे उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेत्यांनी दुष्काळी फोरम नावाने एक स्वतंत्र गट स्थापन केला आहे. पूर्वी या गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळाली होती. मात्र, या गटातील जवळपास सर्वच नेते गेल्या काही वर्षांत भाजप, शिवसेनेत गेले. त्यानंतर हा फोरम शांत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या फोरमने आपली ताकद दाखविली.
भाजपमध्ये असलेले या फोरमधील नेते पक्षाबद्दल काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी नाराजी तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या कार्यपद्धतीवर होती. पृथ्वीराज देशमुख व जगताप यांनी पक्षाकडे अनेक तक्रारी केल्या. पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली; पण या नेत्यांच्या नाराजीची भाजपने दखल घेतली नाही. त्यांचा विरोध डावलून संजय पाटील यांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर या नेत्यांनी उघडपणे पक्षाविरोधात जाऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. परिणामी, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
विरोधात काम करूनही भाजपने दुष्काळी फोरममधील या नेत्यांवर कारवाई केली नाही.
विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये, यासाठी भाजप सावध पावले टाकत असतानाच आता या फोरममधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख व अजितराव घोरपडे यांची बैठक पार पडली. आता विधानसभा निवडणुकीतही तीच भूमिका कायम ठेवण्यावर या बैठकीत नेत्यांची चर्चा झाली.
बाहेरचा उमेदवार चालणार नाही
जत मतदारसंघात बाहेरच्या उमेदवारांची लुडबुड चालली असून, त्यास थोपविण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. भाजपच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्यास विधानसभेला पुन्हा ताकद दाखवण्याचे या बैठकीत ठरले. जत मतदारसंघात वेगळा विचार करून स्वतंत्र आघाडीची स्थापना करून स्थानिक उमेदवारास संधी देण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले.