सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Published: July 5, 2023 11:52 AM2023-07-05T11:52:54+5:302023-07-05T11:53:16+5:30

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

the lowest sowing in the last 20 years In Sangli district, the area of ​​pulses is likely to decrease | सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत किमान १३५.५ मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५.५ टक्केच झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खरीप पेरण्या गेल्या २० वर्षांतील नीचांकी म्हणजे केवळ ५.२६ टक्के झाल्या आहेत. खरीप पेरण्या लांबल्यामुळे कडधान्याचे पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. यापैकी २८ जून २०२३ पर्यंत केवळ १३ हजार ४५८.५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.२६ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या २० वर्षांतील खरीप पेरण्यांची आकडेवारी लक्षात घेतल्यास जवळपास ३५ ते ६० टक्केपर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत होती, तसेच मान्सून पाऊसही १०० मिलिमीटरपर्यंत होत होता; परंतु यावर्षी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यास सुरुवात झाली आहे.

तरीही जिल्ह्यात ५.५ टक्केच पाऊस झाल्याची सांगली पाटबंधारे विभागाची माहिती आहे, तसेच केवळ ५.२६ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पाऊस आणि खरीप पेरण्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. कडधान्याचे पेरणी क्षेत्रही जिल्ह्यात घटण्याची शक्यता असल्याचे कृषी तज्ज्ञांचा अहवाल आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे.

जिल्ह्यात अशी झाली पेरणी

तालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारी
मिरज -२४६७१.१  - ३१३ - १.३
जत - ७८२१० - ९८५.१ - १.४
खानापूर - १६१०० - २०१.१ - ०.५६
वाळवा - २३१२२ - ४५६ - २
तासगाव - ३३१२२ - १५६ - ०.३४
शिराळा - २२६०५ - १०७५० - ४५
आटपाडी - १०७५० - १६३  - १.५
क. महांकाळ - २१३७३.९ - १०६७.४ - ५
पलूस - ६१०८ - ३०४ - ५
कडेगाव - १९९१६ - ४२२ २. - ३४
एकूण - २५५९८४ - १३४५८.५ - ५.२६

वर्षनिहाय ३ जुलैपर्यंतची पेरणी
वर्ष -   टक्केवारी
२०२३    ५.२६
२०२२     ३५
२०२१      ३२
२०२०      ४४
२०१९      ५२

शिराळ्यात १०१७० हेक्टरवर भाताची पेरणी

शिराळा तालुक्यात भात पेरणीचे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० हजार १४२ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. ७४.४६ टक्के भाताची पेरणी झाली असून पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते; परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र असल्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.

Web Title: the lowest sowing in the last 20 years In Sangli district, the area of ​​pulses is likely to decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.