बांगलादेशी तरुणींकडून सांगलीत तक्रारी, गप्प राहण्यासाठी पोलिसांवर ‘वजन’ भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:54 PM2022-12-28T13:54:55+5:302022-12-28T13:55:24+5:30

एका तरुणीने धाडस करत या रॅकेटविरोधात आवाज उठवला. मात्र पोलिसांवर ‘वजन’ भारी ठरल्याने कारवाई थांबली.

The lure of employment lures young Bangladeshi women into prostitution in Sangli, Even after filing a complaint, no action is taken by the police | बांगलादेशी तरुणींकडून सांगलीत तक्रारी, गप्प राहण्यासाठी पोलिसांवर ‘वजन’ भारी

बांगलादेशी तरुणींकडून सांगलीत तक्रारी, गप्प राहण्यासाठी पोलिसांवर ‘वजन’ भारी

googlenewsNext

सांगली : भारतात चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने कोणतीही कायदेशीर पूर्तता न करता बांगलादेशातून तरुणींना आणून वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी अशा पद्धतीने आणलेल्या तरुणीने धाडस करत या रॅकेटविरोधात आवाज उठवला होता. आठवडाभर कारवाईचा फार्स रंगविण्यात आला. त्यानंतर मात्र पोलिसांवर ‘वजन’ भारी ठरल्याने कारवाई थांबली.

चार महिन्यांपूर्वी शहरातील गोकुळनगर परिसरात बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली होती. सामाजिक संस्था व पोलिसांच्या मदतीने यासाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबविण्यात आले होते. त्यावेळी वेश्या व्यवसायासाठी बांगलादेशातून फसवणूक करून आणलेल्या मुलींचा वापर करण्यात आल्याचे समोर आले.

शासनाचे निर्बंध आणि कडक नियमावलीमुळे राज्यातील मोठ्या शहरात आता परदेशातील मुलींचा वापर होत नाही. मात्र, सांगलीसारख्या शहरात या तरुणी आढळून आल्याने त्यांच्यावरील अन्यायाला वाचा कोण फोडणार, हा सवाल आहे. तक्रारी झाल्या तरी पोलिसांवर एजंट आणि वेश्या व्यवसायातील घरमालकिणींचे ‘वजन’ भारी ठरल्याने कारवाई थांबल्याचे बोलले जाते.

ब्यूटी पार्लरच्या नोकरीचे आमिष

बांगलादेशातून तरुणींना आणताना चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे ‘एजंट’ सांगतात. सांगलीत आणलेल्या तरुणीलाही ब्यूटी पार्लरमध्ये चांगली नोकरी असल्याचे सांगत आणण्यात आले होते. त्यानंतर जबरदस्तीने तिला वेश्या व्यवसायात आणण्यात आले. या २२ वर्षीय तरुणीने याबाबत आवाज उठवत सुटका करून घेतली होती. यावेळी तिने कशी फसवणूक झाली, याची कहाणी सांगितली होती.

मुळापर्यंत कारवाई होणार कधी?

यापूर्वीही सांगलीसह अन्य वेश्या व्यवसाय असलेल्या भागात पोलिसांकडून परप्रांतीय व बांगलादेशमधून आणलेल्या तरुणींची सुटका केली होती. केवळ तक्रार आली म्हणून कारवाईचा फार्स न करता त्यासाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या शाखेने प्रत्यक्ष भेटी देऊन या तरुणींची पिळवणूक पाहून कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे.

पोलिसांचे तोंडावर बोट

ऑगस्ट महिन्यात ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवत बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली. मात्र, ज्यांनी तिला सांगलीत आणले होते आणि येथील ज्यांनी तिला वेश्या व्यवसायात ढकलले होते. यापैकी कोणावरही कारवाई झाल्याचे नंतर ऐकिवात आले नाही. पोलिसांचे सोयीस्कर तोंडावर बोट असते.

Web Title: The lure of employment lures young Bangladeshi women into prostitution in Sangli, Even after filing a complaint, no action is taken by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.