Sangli Crime: रुग्णालयासाठी परदेशातून कोटीचा निधी देण्याचे आमिष, डॉक्टरला २५ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:38 PM2023-03-09T13:38:20+5:302023-03-09T13:46:18+5:30
कवठेमहांकाळ पाेलिसांनी एकास केली अटक
शिरढोण : परदेशातून एक काेटीचा निधी मिळवून देण्याच्या आमिषाने कवठेमहांकाळ येथील डॉ. विलास कृष्णा खोत यांना २५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी तुकाराम पांडुरंग यमगर (रा. बेवणूर, ता. जत) याला कवठेमहांकाळ पाेलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याची १० मार्चअखेर पाेलिस काेठडीत रवानगी केली आहे. दुसरा संशयित रजनीभाई गोवर्धनभाई रूपारिलीया (रा. राजकोट, गुजरात) हा पसार झाला आहे.
डॉ. विलास खोत यांचे कवठेमहांकाळ येथे ‘महांकाली हॉस्पिटल’ नावाचे रुग्णालय आहे. तुकाराम यमगर व रजनीभाई रूपारिलीया यांनी या रुग्णालयासाठी परदेशातून एक कोटी रुपये निधी मिळवून देण्याचे आमिष डॉ. खाेत यांना दाखविले. त्यांना विश्वासात घेतले. एक कोटीचा निधी मिळवण्याकरिता प्रथम पंचवीस लाख रुपये अनामत म्हणून भरावे लागतील, भरलेली रक्कमही तुम्हाला परत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्यावर विश्वास ठेवत डॉ. खोत यांनी २५ लाख रुपये दाेघांना दिले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांनी पैसे मिळवून देण्याबाबत टाळाटाळ सुरू केली. हे लक्षात आल्यानंतर डॉ. खाेत यांनी त्यांच्याकडे दिलेले २५ लाख रुपये परत करण्याची मागणी केली. मात्र ही रक्कम देण्यासही यमगर व रूपारिलीया टाळाटाळ करू लागले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. खाेत यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तुकाराम यमगर, रजनीभाई रूपारिलीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यमगर याला अटक केली असून, रुपारिलीया फरार झाला आहे. बुधवारी यमगरला न्यायालयापुढे उभे केले असता, त्याला १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे अधिक तपास करीत आहेत.