Crime News: पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने गंडा; मांत्रिकासह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:29 PM2022-06-25T13:29:14+5:302022-06-25T13:30:18+5:30
जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते.
सांगली : दैवी शक्तीच्याआधारे पैशाचा पाऊस पाडून देतो म्हणत, १५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणखी चौघांना पोलिसांनी अटक केली. मांत्रिक रोहित भालचंद्र बेन्नाळकर (वय ३४, रा. अकलूज), संदीप सुभाष पाटील (३१, रा. अंजनी, ता. तासगाव), रोहित महादेव ऐवळे (३२, रा. खणभाग, सांगली) आणि अरुण शिवलिंग कोरे (३३, रा. म्हैसाळ, ता. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सांगलीतील बादशाह पाथरवटसह दोघांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनील मोतीलाल व्हटकर (रा. बुधवार पेठ, सोलापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापुरात राहणाऱ्या व्हटकर यांना त्यांच्या परिचित असलेल्या शिवानंद हाचगे याने संशयित मांत्रिक आणि पाथरवट पती-पत्नीची ओळख करून दिली होती. चौघांनी संगनमत करून १५ मे ते सोमवार, दि. २० जून या कालावधीत व्हटकर यांना अंकली येथे बोलावून घेतले. तिथे जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच व्हटकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बादशाह पाथरवट याच्यासह त्याच्या पत्नीला अटक केली होती. आता पोलिसांनी अन्य चौघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करीत आहेत.