कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:10 PM2022-10-22T12:10:52+5:302022-10-22T12:11:24+5:30
प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका
सांगली : कवलापूर विमानतळाची जागा एका कंपनीच्या घशात घालून महाआघाडीच्या सरकारने मोठा घोटाळा केला आहे. याची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. या जमीन घोटाळ्यामागे जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यासह एका माजी मंत्र्यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पवार म्हणाले की, कवलापूर विमानतळाची जागा औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. ही १६० एकर जागा केवळ ४४ ते ४५ कोटी रुपयांना एका कंपनीला देण्यात आली. वास्तविक या जागेची किंमत ५०० कोटींपेक्षा अधिक आहे. जागेचा व्यवहार करताना जाहीर लिलाव पद्धतीने केला नाही. गूपचूप व्यवहार करण्यात आला. संबंधित कंपनीला प्रकल्पासाठी ३० एकर जागेची गरज होती. त्यापेक्षा अधिक १३० एकर जागा देण्यात आली आहे. कवडीमोल किमतीने जागा घेऊन प्लाॅट पाडून कोट्यवधी रुपयांना विकण्याचा डाव आहे. यामागे जिल्ह्यातील चार लोक असून, त्यात दोन बडे नेते आहेत, तर दोघेजण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत.
हा व्यवहाराची माहिती तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांना कशी झाली नाही? त्यांनी जनतेसमोर येऊन या साऱ्या प्रकरणाचा खुलासा करण्याची गरज आहे. माजी महापौर सुरेश पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे, पण त्यांनीही ५० एकर जागेची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूबाबतही शंका येते. या जागेत जिल्ह्यातील तरुणांनी उद्योग उभे करावेत. त्यासाठी शासनाने स्वत: प्लाॅट पाडून त्याची जाहीर लिलावाने विक्री करावी, यासाठी भाजपच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पत्र दिले आहे. मकरंद देशपांडे पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यास संबधितांना निश्चित बेड्या पडतील, असेही पवार म्हणाले.