Sangli: इस्लामपूरच्या प्राची मानेचा खुनी कराडजवळ जेरबंद, एकतर्फी प्रेमातून कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:07 PM2024-07-31T12:07:55+5:302024-07-31T12:08:13+5:30

१५ किलोमीटर पाठलाग करून मुसक्या आवळल्या

The man who killed Prachi Vijay Mane of Islampur out of one-sided love was arrested near Karad | Sangli: इस्लामपूरच्या प्राची मानेचा खुनी कराडजवळ जेरबंद, एकतर्फी प्रेमातून कृत्य 

Sangli: इस्लामपूरच्या प्राची मानेचा खुनी कराडजवळ जेरबंद, एकतर्फी प्रेमातून कृत्य 

सांगली : इस्लामपुरातील प्राची विजय माने (वय २१, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला. चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठाणमध्ये रविवारी (दि. २८ ) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अविराज रामचंद्र खरात (रा. माने मळा, साखराळे, ता. वाळवा, जि. सांगली) या संशयित आरोपीस पोलिसांनी कराडजवळ जेरबंद केले.

चाकणी येथे प्राचीच्या खुनानंतर अविराज पळून गेला होता. तो साताऱ्याकडे दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कऱ्हाडजवळ सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. म्हाळुंगे औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अविराज याने मैत्रीण प्राचीकडे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु, तिने नकार दिल्याने तो संतापला होता. रविवारी (दि. २८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्राची राहत असलेल्या आंबेठाण येथील खोलीवर तो गेला. ‘तू माझ्याशी लग्न का करत नाहीस?’ असा त्याने जाब विचारला. त्यानंतर तिचा मोबाइल घेऊन चाकण ते आंबेठाण रस्त्याजवळील मोकळ्या मैदानात आला. प्राची त्याच्याकडे आपला मोबाइल परत घेण्यासाठी मैदानात आली. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. अविराजने अंधाराचा फायदा घेऊन प्राचीवर अचानक चाकूने हल्ला केला. तिच्या गळ्यावर वार केले. खोलवर वार होऊन तीव्र रक्तस्राव झाला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

खुनानंतर अविराज दुचाकी (एमएच १० ईएफ ४१५४ ) वरून पळून गेला. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा (युनिट ३) च्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत त्याचा माग काढला. तो सातारा ते कऱ्हाडदरम्यान दुचाकीवरून जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस पथकाने तेथे सापळा रचला. पण, पोलिसांना पाहून अविराजने हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरून पळून जाऊ लागला. पोलिसांनी सुमारे १० ते १५ किलोमीटर त्याचा पाठलाग करीत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

दोघेही इस्लामपूरचे रहिवासी

संशयित अविराज हा मूळ जत तालुक्याचा आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे वडील चरितार्थासाठी इस्लामपूर परिसरात कुटुंबासह आले होते. येथे त्यांना एका साखर कारखान्यात नोकरी मिळाली होती. प्राची मूळची चरेगाव (जि. सातारा) येथील आहे. तीदेखील कुटुंबीयांसह साखराळे येथे मामांकडे राहण्यास आली होती. सध्या भावंडांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. तिच्या मृतदेहावर चरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The man who killed Prachi Vijay Mane of Islampur out of one-sided love was arrested near Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.