Sangli: विट्यात मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 01:34 PM2024-09-26T13:34:11+5:302024-09-26T13:34:38+5:30
विटा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाजाचे नेते संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू केले ...
विटा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाजाचे नेते संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. परंतु, या उपोषणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी २ ऑक्टोबरला विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन बुधवारी विट्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे-पाटील मागण्या मान्य कराव्यात, यासाठी सकल मराठा समाजाचे संघटक शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी विटा तहसील कार्यालयावर धडक दिली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची मुख्यमंत्र्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून आरक्षणप्रश्नात मध्यस्थी करावी व जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
काळे झेंडे दाखविण्याचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले नाही तर २ ऑक्टोबरला मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार विटा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी त्यांना गनिमी कावा करून काळे झेंडे दाखवित त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शंकर मोहिते, दहावीर शितोळे, शशिकांत शिंदे, कृष्णत देशमुख, प्रवीण जगताप, सतीश खाडे, महेश बाबर, ॲड. ऋषिकेश देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.