संतापजनक! मुलगी झाल्याने विवाहितेला बाळासह घरातून हाकलले, मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 02:02 PM2022-05-25T14:02:00+5:302022-05-25T14:06:01+5:30
शाहिन जमखानवाले यांचा अरिफ या दोघांचाही दुसरा विवाह झाला होता. अरिफ यास पहिल्या पत्नीच्या दोन मुली आहेत.
मिरज : मुलगी जन्माला आल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेला नवजात बाळासह घरातून हाकलून दिले. याबाबत शाहिन अरिफ जमखानवाले (वय-२२, रा. माळी गल्ली, मिरज) या विवाहितेने शहर पोलिसात पती, सासू, सासरा व नणंदेविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पती अरिफ नजीर अहमद जमखानवाले, सासरा नजीर अहमद बशीर जमखानवाले, सासू नसरीन मोहसीन मिरजकर (तिघे रा. माळी गल्ली, मिरज) व नणंद यासिन मुस्ताक कसबा (रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाहिन जमखानवाले यांचा अरिफ या दोघांचाही दुसरा विवाह झाला होता. अरिफ यास पहिल्या पत्नीच्या दोन मुली आहेत. शाहिनकडून सासरच्यांना मुलगा हवा होता. शाहिनला मुलगाच झाला पाहिजे, म्हणून दबाव आणून दमदाटी, शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. मात्र पुन्हा मुलगी झाल्याने सासरच्यांनी रुग्णालयात येऊन शाहिनला शिवीगाळ केली.
बाळंतपणानंतर शाहिन मुलीला घेऊन घरी आल्यानंतर पती, सासरा, सासू व नणंदेने, ‘आम्हाला वंशाला दिवा पाहिजे होता. पण मुलगीच जन्माला आली. आता तुझ्या मुलीचा व तुझा सांभाळ करण्यासाठी माहेरातून पाच लाख रुपये आण’, असे म्हणून जन्मलेल्या नवजात मुलीसह शाहिनला घरातून हाकलून दिले.