Sangli: ‘रिलायन्स ज्वेल्स’वरील दरोड्याचा म्होरक्या अखेर ताब्यात, बिहारमधील कारागृहातून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:11 PM2023-12-04T12:11:12+5:302023-12-04T12:14:24+5:30

चित्रपटाच्या कथेप्रमाणे दरोड्याचा आराखडा

The mastermind of the robbery at Reliance Jewels in Sangli has finally been arrested | Sangli: ‘रिलायन्स ज्वेल्स’वरील दरोड्याचा म्होरक्या अखेर ताब्यात, बिहारमधील कारागृहातून घेतले ताब्यात

Sangli: ‘रिलायन्स ज्वेल्स’वरील दरोड्याचा म्होरक्या अखेर ताब्यात, बिहारमधील कारागृहातून घेतले ताब्यात

सांगली : संपूर्ण राज्यात गाजलेल्या, शहरातील मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवरील दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारास सांगलीपोलिसांनी बिहारमधील बेऊर (पटणा) कारागृहातून ताब्यात घेतले. सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग (रा. चिश्तीपूर, थाना - चंडी, जि. नालंदा, राज्य बिहार) असे त्याचे नाव आहे. संपूर्ण देशभरात तब्बल ३२ गुन्हे दाखल असलेला सुबोध ताब्यात मिळाल्याने दरोड्यातील ऐवज आणि एकूणच गुन्ह्याचा उकल होणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली.

४ जून रोजी भर दिवसा रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून ६ कोटी ४४ लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले होते. तेव्हापासून सांगली पोलिस आठहून अधिक राज्यांत या दरोड्यातील संशयितांचा शोध घेत होते. यातील अंकुरप्रताप सिंह या संशयिताला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर अन्य एका गुन्ह्यात कारागृहातच असलेल्या सुबोध सिंगला आता अटक करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात ओडिशा राज्यातील रिलायन्स ज्वेल्स शोरूमवर दरोडा टाकण्यात आला. मात्र, प्लॅन फसल्याने यातील संशयित पोलिसांना सापडले. त्यात अंकुरप्रताप रामकुमार सिंग हादेखील होता. हाच अंकुरप्रताप सांगलीतील दरोड्यावेळी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. दरोडा टाकण्यात आल्यानंतर त्यानेच सीसीटीव्ही बंद पाडत डीव्हीआर ताब्यात घेतला होता. त्याच्याकडील अधिकच्या माहितीमध्ये मुख्य सूत्रधार सुबोध सिंगचे नाव पोलिसांसमोर आले. तो एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत बिहारमध्ये असल्याची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी त्यात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १२ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सांगलीतील दरोडा सुबोधने पाहिला लाइव्ह

कारागृहातच असलेल्या सुबाेध सिंगने तिथूनच सांगलीतील दरोड्याची सूत्रे आखली होती. त्याने सांगलीतील दरोडा तिथून लाइव्ह पाहिला होता. त्यावेळी तो प्रत्येकाला निर्देश देत होता. अगदी डीव्हीआर कुठे ठेवला असेल याचीही माहिती त्याने दिली आणि तेथेच डीव्हीआर होता अशीही माहिती आता समोर येत आहे.

सुबोध शिक्षित तितकाच कुख्यात

दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंग हा अभियांत्रिकी शाखेचा पदविकाधारक आहे. मात्र, संपूर्ण देशातील मोठ्या दरोड्यातील त्याचा सहभाग आढळून येत आहे. फायनान्स कंपनी, रिलायन्स ज्वेल्ससारखे शोरूमवर धाडसी पद्धतीने दरोडा टाकून कोट्यवधींचा माल लंपास करण्यासाठी तो प्लॅन तयार करत असे. त्यामुळे सुबोधकडून गुन्ह्याची माहिती घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे.

चित्रपटाच्या कथेप्रमाणे आराखडा

चित्रपटाच्या कथेप्रमाणे सुबोधच्या टोळीतील सदस्य संपूर्ण देशभरातील राज्यातील आहेत. दरोड्यासाठी ‘स्पाॅट’ ठरला की त्यावर प्लॅन करत दरोडा टाकला जातो. त्यानंतर हे सदस्य निघून जातात. सुबोध या साऱ्याचे नियोजन करतो. केवळ दरोडाच नव्हे तर यासह इतर गुन्ह्यातही त्याचा सहभाग आहे. त्यामुळेच त्याला ठेवण्यात आलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारात बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: The mastermind of the robbery at Reliance Jewels in Sangli has finally been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.